गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईकरांनी वाहन खरेदीकडे पाठ फिरवली आहे. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजे ५ एप्रिल रोजी मुंबईतील आरटीओंमध्ये १,१४३ चारचाकी आणि दुचाकी तसेच अन्य वाहनांची नोंदणी झाली आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या कमी असल्याचे समोर आले आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने आणि वाहन खरेदीवर अधिक भर दिला जातो. पाडव्याच्या आदल्या दिवशी अनेक जण दुचाकी, चारचाकी, तीनचाकीसह अन्य वाहने खरेदी करतात. मात्र या वेळी मुंबईकरांनी वाहन खरेदीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
५ एप्रिल रोजी मुंबईतील आरटीओंमध्ये ४२३ चारचाकी व अन्य वाहने, तर ६९८ दुचाकी वाहन नोंदणी झाली असल्याचे आरटीओकडून सांगण्यात आले. अंधेरी आरटीओत गेल्या वर्षी १७ मार्च २०१८ रोजी ३४८ चारचाकी, अन्य वाहने आणि दुचाकींची नोंदणी झाली होती. यंदा हीच नोंदणी ३०५ पर्यंत झाल्याचे सांगण्यात आले. वडाळा आरटीओतही वाहन नोंदणी घटलेली आहे. गेल्या वर्षी ५७० वाहन नोंदणी झालेली असतानाच या वेळी ३८२ वाहन नोंदणी, तर ताडदेव आरटीओतही या वेळी ४४६ वाहनांची नोंदणी झाली असून गेल्या वर्षीही जवळपास तेवढीच नोंदणी झाली होती.
आरटीओला चांगला महसूल
वाहन नोंदणीत जरी घट झाली असली तरी आरटीओला त्या नोंदणीमुळे महसूल मिळाल्याचे दिसते. कारण एकाच दिनांकाची वाहन नोंदणी आणि महसूल हा वेगवेगळा आहे. म्हणजेच ५ एप्रिल रोजी नोंदणी झालेल्या वाहनमालकांनी वाहन कर त्याच दिवशी भरला असेल असे निश्चित नाही. तो कर १, २, ३ किंवा ४ एप्रिल रोजीही भरला असेल. तर ६ किंवा ७ एप्रिल रोजी झालेली वाहन नोंदणीचा कर हा त्याआधी म्हणजेच ५ एप्रिल रोजीही भरला असेल, असे आरटीओने स्पष्ट केले.