मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली. यानंतर प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाना त्यांनी उत्तर दिलं. तसेच, यावेली उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ग्रामपंचायत निकालांच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिल्लक सेना असे संबोधल्याचेही समोर आले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले “आजच्या ग्रामपंचायतींच्या निकालांनी आमच्या शिवसेना-भाजपा युतीवर शिक्कामोर्तब केला आहे. तुम्ही शिंदे गट जे म्हणताय हा शिंदे गट नाही ही शिवसेना आहे, तिकडे शिल्लक सेना आहे. त्यामुळे आमच्याबरोबर आलेली मुख्य शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित आहे. त्यांच्या विचारांवर चालणारी, हिंदुत्वावर चालणारी शिवसेना आहे. या शिवसेनेची आणि भाजपाची जी युती आहे, त्या आमच्या युतीला पूर्णपणे लोकांनी स्वीकारलेलं आहे. साडेपाचशे पैकी ३०० पेक्षा जास्त ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि भाजपा असं आम्ही निवडून आलेलो आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की ही भविष्याचीच नांदी आहे.”
याशिवाय “शिवसेना जी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आहे, ती शिवसेना आणि आम्ही एकत्रित सगळ्या निवडणुका लढणार आहोत. सगळीकडे आमचा विजय होताना तुम्हाला दिसेल.” असा विश्वास देखील यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केला.
कोस्टल रोड प्रोजेक्टबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले “ हा मुंबईचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मूळात ही संकल्पना २५ वर्षे जुनी आहे. परंतु ही संकल्पना कधीच अस्तित्वात येत नव्हती. २०१४ मध्ये ज्यावेळी आमचं सरकार आलं, त्यानंतर मी स्वत: पंतप्रधान मोदींकडे गेलो आणि तेव्हाच्या आमच्या सरकारने या कोस्टल रोडसाठी परवनगी मिळवली. कारण, आपल्याकडे कोस्टरोडसाठी रिक्लिमेशनसाठी कोणताही कायदा नव्हता. दोन वर्षे प्रयत्न करून सगळ्या परवानग्या आपण मिळवल्या आणि त्याच्यानंतर याचं काम सुरू झालं आहे. आता मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत: यामध्ये लक्ष घातलेलं आहे. कुठल्याही परिस्थितीत याला उशीर होऊ नये. हा वेळेत झाला पाहिजे हा मुंबईचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे जेवढे पायाभूत सुविधांचे प्रकल्प आहे, मागील दोन वर्षात जे बंद पडले होते, मंदावले होते, थांबले होते त्या सगळ्या प्रकल्पांना मुख्यमंत्री शिंदे यांनी गती दिली आहे. त्या गतीचा एक भाग म्हणून आज आम्ही या ठिकाणी पाहणीसाठी आलो आहोत. पाहायला जरी आज आलो असलो तरी या संदर्भातील तीन बैठका या अगोदरच मुख्यमंत्री शिंदेंकडे झालेल्या आहेत. या तिन्ही बैठकांमध्ये या प्रकल्पासमोरील सर्व अडचणी दूर झालेल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो हा मुंबईचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि आमचं सरकार हे हा प्रोजेक्ट पूर्ण करून दाखवणार.”