मुंबई: राज्यातील अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता. मुख्यमंत्र्यांना हे माहीत असूनही त्यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने काहीही केले नाही. राज्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने नुकसान होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेलंगणात दुसऱ्या पक्षाचा प्रचार करीत आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
मुंबईत सुरू असलेल्या नियोजनशून्य विकासामुळे प्रदूषण झाले आहे. स्वत:चे राज्य न सांभाळणारे मुख्यमंत्री तेलंगणातील प्रचारात मग्न आहेत. त्यामुळे सरकारने राज्य वाऱ्यावर सोडले आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिम रक्कम दिवाळीपूर्वी जमा न झाल्यास दिवाळी साजरी करणार नाही, असे आश्वासन देणारे कृषिमंत्री धनजंय मुंडे यांनी पाळले नाही. काही शेतकऱ्यांची तर तुरळक रक्कम देऊन थट्टा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यास गरीब शेतकऱ्याचा मुलगा म्हणून गळा काढला जातो. अशा गरीब शेतकऱ्यांचे पंचतारांकित वैभव राज्यातील प्रत्येक छोटय़ा शेतकऱ्याला लाभो, असा टोला ठाकरे यांनी लगावला. निवडणुका आल्यावर तिजोरी खुली करणारे भाजप नेते राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीवर मदतीचा हात कधी फिरवणार याची महाराष्ट्र वाट पाहात आहे, असे ठाकरे यांनी नमूद केले.