’नव्या गाडय़ा कंत्राटी पद्धतीने घेण्याचा प्रस्ताव प्रलंबित
राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वात प्रतिष्ठित मानल्या गेलेल्या व्होल्वोमुळे येत्या काही दिवसांमध्ये प्रवाशांचे आयुष्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. एसटीच्या ताफ्यात असलेल्या व्होल्वो बसपैकी २५ बसगाडय़ांचे आयुष्य संपलेले आहे. या बसमधील वातानुकूलित प्रणाली, आसने, पडदे यांची वाट लागली आहे. या बसगाडय़ा बदलण्यासाठी नव्या ३५ गाडय़ा कंत्राटी पद्धतीने एसटीच्या ताफ्यात घेण्याचा प्रस्ताव जानेवारी महिन्यापासून एसटीकडे प्रलंबित आहे. या प्रस्तावातील खासगी कंपन्यांसाठीच्या अनुभवाची अट शिथील करूनही या प्रस्तावाचे पुढे काहीच झालेले नाही. त्यामुळे यंदाच्या उन्हाळी हंगामात नवीन मार्ग सुरू करणे तर दूरच, सध्याच्या मार्गावरही गाडय़ा चालवणे प्रशासनाला जड जाणार आहे.
११५ व्होल्वो बसेसपैकी ९० बस कंत्राटी पद्धतीवर आहेत तर एसटीने २५ गाडय़ा विकत घेतल्या आहेत. या सर्व गाडय़ांपैकी २५ गाडय़ांचे आर्युमान संपत आले आहे. उन्हाळी हंगामात दरवर्षी एसटी काही जादा मार्गावर व्होल्वो गाडय़ा चालवते. यंदाही एसटीने १० नवीन मार्गावर उन्हाळ्यापुरत्या व्होल्वो बसगाडय़ा चालवण्याची योजना आखली होती. त्यासाठी एप्रिल महिन्यापर्यंत एसटीच्या ताफ्यात ३५ नव्या व्होल्वो कंत्राटी पद्धतीने याव्यात, यासाठी वाहतूक विभागाने जानेवारी महिन्यात एसटी महामंडळाकडे एक प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावानुसार कंत्राटी पद्धतीने बसगाडय़ा देणाऱ्या खासगी कंपनीकडे किमान पाच बसगाडय़ा असाव्यात आणि त्या कंपनीला प्रवासी वाहतुकीचा किमान पाच वर्षांचा अनुभव असावा, अशा अटी
टाकल्या होत्या.
जानेवारी महिन्यातील या प्रस्तावाला काहीच उत्तर न आल्याने महिनाभराने प्रस्तावातील अनुभवाची अट शिथील करून पाचऐवजी दोन वर्षांपर्यंत कमी करण्यात आली. ही अट शिथील करूनही एसटीला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. उन्हाळी हंगाम सुरू होण्याआधी एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत या गाडय़ा ताफ्यात दाखल होणे अपेक्षित होते. या गाडय़ा आल्यानंतरच आर्युमान संपत असलेल्या २५ गाडय़ा बाद केल्या जाणार होत्या. मात्र आता ते शक्य नसल्याचे समजते.
नव्या गाडय़ा कंत्राटी पद्धतीने घेण्याचा प्रस्ताव वाहतूक विभागाने पाठवला होता. वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक सूर्यकांत अंबाडेकर यांना विचारले असता, या प्रस्तावाबाबत अजूनही प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अनुभवाची अट शिथील करण्यामागचे कारण त्यांनी स्पष्ट केले नाही. ही प्रक्रिया नियमानुसारच सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यंदाच्या उन्हाळ्यात या गाडय़ा एसटीच्या ताफ्यात दाखल होणार नसून आयुर्मान संपलेल्या गाडय़ांमधूनच प्रवास करावा लागणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा