मुंबई : यंदा गणेशोत्सवात पीओपी बंदीच्या निर्णयाची १०० टक्के अंमलबजावणी करण्यात येणार असून मुंबईबाहेरून येणाऱ्या गणेशमूर्तींनाही अटकाव करण्यात येणार आहे. ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून मुंबईत पीओपी मूर्ती येऊ नये यासाठी महापालिकेने कोकण विभागीय आयुक्ताना मार्च महिन्यात पत्र पाठवले आहे. यामध्ये पीओपी मूर्ती मुंबईत येऊ नये यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींवर २०२० मध्ये बंदी घातली होती. मात्र विविध कारणांमुळे या निर्णयाची अंमलबजावणी लांबणीवर पडली. मात्र उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर यंदा माघी गणेशोत्सवापासून १०० टक्के पीओपीबंदीचा निर्णय लागू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. माघी गणेश जयंती उत्सवात पीओपी गणेश मूर्तींची कुठेही विक्री होऊ देऊ नका. ती झाली असल्यास त्या गणेशमूर्तींचे विसर्जन करू देऊ नका, असे आदेश उच्च न्यायालयाने ३० जानेवारी रोजी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी), राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेसह अन्य महापालिकांना दिले होते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने १२ मे २०२० रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले आहेत. भाद्रपदातील गणेशोत्सवातही या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याकरीता पालिका प्रशासनाने आतापासून नियोजन सुरू केले आहे.

पीओपी मूर्ती घडवू नये

गणेशोत्सवाला अद्याप पाच सहा महिन्यांचा कालावधी असला तरी यंदा गणेशोत्सव पर्यावरणपूरक असावा याकरीता पालिकेने आधीपासूनच नियोजन सुरू केले आहे. केवळ पर्यावरणपूरक मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांनाच यंदा मंडपासाठी परवानगी दिली जाणार आहे. तसेच मूर्तिकारांना यंदाही विनामूल्य शाडूची माती दिली जाणार आहे. मात्र मुंबई बाहेरून येणाऱ्या पीओपीच्या गणेशमूर्तींना अटकाव करण्यासाठी मुंबई महापालिकेने आता कोकण विभागीय आयुक्तांना पत्र लिहिले आहे. ठाणे,रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत घडविण्यात येणाऱ्या गणेशमूर्तीना मुंबई मोठी मागणी असते. गणेशोत्सवापूर्वी मोठ्या संख्येने या मूर्ती मुंबईत आणल्या जातात व इथे विकल्या जातात. मात्र तेथील मूर्तिकारांनी पीओपी मूर्ती घडवू नये आणि मुंबईत पाठवू नये यासाठी मुंबई महापालिकेने नियोजन सुरू केले असून थेट कोकण विभागीय आयुक्त यांना पत्र पाठवले आहे.

अंमलबजावणीत पर्यावरण विभागही

पीओपी बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेने आता पर्यावरण विभागालाही समाविष्ट करून घेतले आहे. येत्या गणेशोत्सवात पीओपी मूर्ती घडवणे आणि त्यांचे विसर्जन होऊ न देणे यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडूनही नियोजन केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.