मुंबई : दिवाळीच्या सुट्ट्यांपासून डिसेंबरपर्यंत थंडीचा मौसम असल्याने या कालावधीत देशांतर्गत आणि देशाबाहेरही भ्रमंतीसाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. यंदा दिवाळीच्या सुट्टीतील जवळपास सगळ्याच टूर्ससाठी ‘हाऊसफुल’ नोंदणी असून परदेशातील ठिकाणांपेक्षा देशांतर्गत पर्यटन स्थळांकडे पर्यटकांचा अधिक ओढा दिसून येत असल्याचे पर्यटन व्यावसायिकांनी सांगितले.

दसरा आणि दिवाळीच्या सुट्टीचे औचित्य साधत विविध ट्रॅव्हल कंपन्यांच्या माध्यमातून विविध ठिकाणाच्या पर्यटनासाठी नोंदणी करणाऱ्यांच्या संख्येत गेल्यावर्षीपेक्षा २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दिवाळीपासून सगळ्या टूर्स हाऊसफुल आहेत. केरळ, राजस्थान, अंदमान या ठिकाणांना पर्यटकांची अधिक पसंती मिळाली आहे. देशांतर्गत पर्यटनावरच अधिक भर असून परदेशात व्हिएतनाम-कंबोडिया, श्रीलंका आदी देशांना अधिक पसंती मिळत आहे, अशी माहिती ‘मँगो हॉलिडेज’चे मिलिंद बाबर यांनी दिली. तर दिवाळीनिमित्त खास मराठीजनांसाठी जपानसारख्या देशांच्या टूर्स आयोजित केल्या असून तिथे त्यांना महाराष्ट्रीय पदार्थांसह, मराठी टूर गाईड आदी सोयीसुध्दा उपलब्ध केल्या आहेत. याशिवाय, देशांतर्गत नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान काश्मीरच्या ग्रुप टूर्स, लेह-लडाख आणि भूतानसारख्या वेगळ्या देशातील पर्यटनासाठी आमच्याकडे नोंदणी पूर्ण झाली आहे, अशी माहिती थॉमस कुकचे राजीव काळे यांनी दिली.

हेही वाचा…दादरमध्ये वाहतूक कोंडी; ‘बेस्ट’ मार्गात बदल करण्याची नामुष्की

कुटुंब विशेषत: मुले वा नातेवाईक परदेशात असल्याने अनेकांना दिवाळी एकट्यानेच मायदेशात साजरी करावी लागते, असे अनेत जण दिवाळी एखाद्या पर्यटनस्थळी फिरायला जाऊन साजरी करतात, असे ‘केसरी टूर्स’च्या झेलम चौबळ यांनी सांगितले. वन्यजीव आणि कृषी पर्यटनाकडे अधिक कल

दिवाळीच्या सुट्टीत ताडोबासह अन्य अभयारण्ये, महाबळेश्वर – माथेरान आणि तोरणमाळसारखी थंड हवेची ठिकाणे आणि कृषी पर्यटन अनुभवण्याकडे पर्यटकांचा अधिक कल आहे, अशी माहिती पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली.

केरळ, राजस्थान, अंदमानला अधिक पसंती असून निवडणुकांच्या आठवड्यात पर्यटकांच्या संख्येवर १५ ते २० टक्के परिणाम होईल, असा अंदाज आहे.

हेही वाचा…Ravi Raja : मुंबईत काँग्रेसला धक्का! रवी राजा यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

मतदानाविषयी पर्यटक जागरूक

नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांत अधिक पर्यटन केले जाते. मात्र महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी निवडणूक होत आहे. त्यामुळे अनेकांनी या काळातील आपले दौरे रद्द करून वा मागेपुढे करून मतदानासाठी आपापल्या शहरात उपस्थित असू याची काळजी घेतली आहे. ‘केसरी टूर्सचीही नोव्हेंबर – डिसेंबरमधील दौऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. निवडणूक होत असलेल्या आठवड्यातील दौऱ्यांची पूर्वनोंदणी झाली होती. मात्र निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने त्यावर परिणाम झाला आहे. मात्र पर्यटक मतदानाविषयी सजगतेने निर्णय घेत आहेत. हा बदल स्वागतार्ह असल्याचे निरीक्षण झेलम चौबळ यांनी नोंदवले. निवडणुकांमुळे २० नोव्हेंबरच्या आठवड्यातील पर्यटन व्यवसायाला १५ ते २० टक्के फटका बसला असल्याचे मिलिंद बाबर यांनी स्पष्ट केले.