अर्थमंत्र्यांचे सूतोवाच
सध्या असलेल्या गुंतागुंतीच्या योजना आणि किचकट नियम यामुळे सामान्य गुंतवणूकदार भांडवली बाजारापासून चार हात लांब राहत असून त्याला आकर्षित करणाऱ्या उपाययोजना यंदाच्या अर्थसंकल्पात असतील, असे सूतोवाच पंधरवडय़ाने नव्या वर्षांचा अर्थसंकल्प सादर करण्याच्या तयारीत असलेल्या पी. चिदंबरम यांनी शनिवारी देशाच्या आर्थिक राजधानीत केले.
नव्या गुंतवणूकदारांना भांडवली बाजारात प्रवेश मिळणाऱ्या ‘राजीव गांधी इक्विटी योजने’चा मुंबईत शुभारंभ करताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ही योजना अधिक सुटसुटीत करण्याबरोबरच गुंतवणूकदारांना अधिक आकर्षित करण्यासाठी योजनेपासून मिळणारे लाभ आगामी अर्थसंकल्पात दिसून येईल, असे स्पष्ट केले. याचबरोबर डिमॅट अथवा ‘केवायसी’साठी विविध नियामकांमार्फत होणारी टप्प्या-टप्प्यावरील विचारणा याबद्दल नाराजी व्यक्त करत चिदंबरम यांनी असेच चालू राहिले तर अधिकाधिक गुंतवणूकदार वेळ वाचविण्यासाठी सोने खरेदीकडे वळतील, अशी भीतीही व्यक्त केली. तत्कालिन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी १६ मार्च २०१२ रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात उल्लेख केलेल्या या योजनेत चिदंबरम यांनी या खात्याचा कार्यभार हाती घेताच अनेक बदल केले. समभाग गुंतवणुकीबरोबरच म्युच्युअल फंड पर्याय उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर सध्या ५० हजार रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर ५०% टक्क्यांपर्यंत कर वजावट मिळणारे हे माध्यम यादृष्टीने अधिक विस्तारले जाणार आहे.
केंद्रीय सांख्यिकी संघटनेने देशाच्या चालू आर्थिक वर्षांसाठी अंदाजित केलेला ५ टक्के हा विकास दर दशकातील सर्वात कमी नसल्याचा दावा करतानाच मार्च २०१३ अखेर भारताची प्रगती ५.५ टक्के वेगाने निश्चित होईल, असा विश्वास चिदंबरम यांनी व्यक्त केला. केंद्रीय सांख्यिकी संघटनेने ५ टक्के दर अभिप्रेत केलेला विकास दराचा अंदाज हा एप्रिल ते नोव्हेंबरमधील घडामोडींवर आधारित असून दुसऱ्या अर्ध आर्थिक वर्षांत सुरू झालेल्या आर्थिक सुधारणेच्या पावलांमुळे येत्या दोन आर्थिक वर्षांत हा ६ ते ८ टक्के राहिल, असेही ते म्हणाले.
‘इनसायडर ट्रेडिंग’ खपवून घेतले जाणार नाही
भांडवली बाजारातील समभाग खरेदी-विक्रीच्या गैरव्यवहाराबाबत सजगता व्यक्त करतानाच केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी भारतात ‘इनसायडर ट्रेडिंग’ खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा दिला. ‘एमसीएक्स-एसएक्स’ या देशात नव्याने उदयास येऊ पाहणाऱ्या भांडवली बाजाराचे उद्घाटन करताना अर्थमंत्र्यांनी भांडवली बाजारातील गुंतवणूक-व्यवहार वाढण्यासाठी गुंतवणूकदारांचा विश्वास बळावेल, या दिशेने प्रयत्न होण्याची आवश्यकता मांडली.
यंदाचा अर्थसंकल्प सुटसुटीत!
सध्या असलेल्या गुंतागुंतीच्या योजना आणि किचकट नियम यामुळे सामान्य गुंतवणूकदार भांडवली बाजारापासून चार हात लांब राहत असून त्याला आकर्षित करणाऱ्या उपाययोजना यंदाच्या अर्थसंकल्पात असतील, असे सूतोवाच पंधरवडय़ाने नव्या वर्षांचा अर्थसंकल्प सादर करण्याच्या तयारीत असलेल्या पी. चिदंबरम यांनी शनिवारी देशाच्या आर्थिक राजधानीत केले.
आणखी वाचा
First published on: 10-02-2013 at 02:46 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This year budget is convenient