दिल्लीत राजपथावर होणाऱ्या सोहळ्याच्या धर्तीवर आता राज्यातही प्रजासत्ताक दिनाचा भव्य सोहळा शिवाजी पार्कऐवजी मरिन ड्राइव्हवर आयोजित करण्याचा निर्णय गुरुवारी राज्य सरकारने घेतला.
राज्यात प्रजासत्ताक दिनाचा सोहळा आजवर शिवाजी पार्कवर साजरा होत असे. मात्र हा सोहळा मरिन ड्राइव्हवर झाला तर अधिक प्रदर्शनीय आणि दिमाखदार होईल असा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू होता. मात्र त्यास केंद्र सरकारची परवानगी मिळत नव्हती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर केंद्राने या सोहळ्यास हिरवा कंदील दाखविला. त्यानंतर राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी केलेल्या सूचनेनुसार सरकारने सर्व पक्षांच्या नेत्यांशी सल्लामसलत केली असता त्यांनीही या स्थानबदलास पाठिंबा दिला.
त्यानुसार यंदाचा प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा शिवाजी पार्कऐवजी मरिन ड्राईव्हवर आयोजित करण्यावर राज्य मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले. त्यानुसार मरिन ड्राईव्हवरील बॅरिस्टर रजनी पटेल चौकात शासकीय ध्वजारोहण होणार असून त्यानंतर राज्याच्या विकासाबाबतचे विविध विभागांचे चित्ररथ, तसेच प्रात्यक्षिके होतील. त्यात पोलीस, गृहरक्षक दलाबरोबरच नौदल, भूदल आणि हवाई दलाच्या वतीने संचलन पथके, बँड पथके आपले कौशल्य दाखविणार आहेत. पहिल्या तीन उत्कृष्ट चित्ररथांना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख आणि १५ लाख रुपये देण्यात येणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This year maharashtras republic day parade on marine drive