प्रेक्षकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे सणानिमित्त दोन मराठी चित्रपट प्रदर्शित

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सणांना एक तरी बिग बजेट मोठय़ा कलाकाराला घेऊन चित्रपट प्रदर्शित करायचा ही बॉलीवूडची प्रथा आहे. त्या प्रथेला अनुसरूनच तब्बल सोळा वर्षांनी परतलेल्या दिग्दर्शक सूरज बडजात्या आणि त्यांचा लाडका ‘प्रेम’ सलमान खान या जोडीच्या ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटाला दिवाळीच्या मुहूर्तावर तब्बल दोन आठवडय़ांची जागा देण्यात आली आहे. हिंदीत हा एकच चित्रपट प्रेक्षकांसाठी असला तरी यंदाच्या दिवाळीत सलमान खानच्या चित्रपटासमोर दोन बिग बजेट मराठी चित्रपट दंड ठोकून तिकीटबारीवरच्या मैदानात उतरले आहेत.
एरव्ही सणांपासून फटकून वागणारे मराठी चित्रपटांचे निर्माते प्रेक्षकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेत उभे राहायला तयार झाले असल्याने यंदाची दिवाळी ही मराठी चित्रपटांचीच आहे, असा विश्वास मराठी चित्रपटकर्मीकडून व्यक्त होतो आहे.
प्रत्येक सणाला एक हिंदी बिग बजेट चित्रपट असल्याने आजवर मराठी चित्रपट निर्मात्यांनी मराठी चित्रपटांसाठी अन्य तारखा घेणे पसंत केले होते. या वर्षी पहिल्यांदाच बडजात्या प्रॉडक्शनचा चित्रपट असतानाही ‘झी स्टुडिओ’ची निर्मिती असलेला, सुबोध भावे दिग्दर्शित ‘कटय़ार काळजात घुसली’ आणि ‘मिराह एंटरटेन्मेट’, ‘इरॉस’ यांचे वितरण असलेला सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘मुंबई पुणे मुंबई २’ हे दोन मोठे चित्रपट १२ नोव्हेंबरला ऐन दिवाळीत प्रदर्शित होत आहेत. हिंदीच्या स्पर्धेत मराठी चित्रपटांनी उभे राहिलेच पाहिजे.
आत्तापर्यंत मराठी चित्रपटांना प्रेक्षकांनी ज्या तऱ्हेचा पाठिंबा, प्रतिसाद दिला आहे ते पाहता मराठी प्रेक्षकांना मराठीच चित्रपट हवा आहे, हे सिद्ध झालेले आहे. प्रेक्षकांनी मराठी चित्रपटांना उभे केले आहे. आता हिंदीशीही स्पर्धा करून पुढे जायची जबाबदारी मराठी चित्रपटकर्त्यांची आहे, असे मत ‘झी स्डुडिओ’चे व्यवसाय प्रमुख निखिल साने यांनी व्यक्त केले, तर आजवर सणांच्या दिवशी केवळ हिंदी चित्रपट प्रेक्षकांना पाहावे लागत होते. त्यांच्यासाठी अन्य पर्याय नव्हते. या वर्षी ‘कटय़ार काळजात घुसली’ आणि ‘मुंबई पुणे मुंबई २’ असे दोन पर्याय प्रेक्षकांसमोर उपलब्ध आहेत, असे ‘एमपीएम २’चे निर्माते संजय छाब्रिया यांनी सांगितले.

२० ते ३० कोटींची उलाढाल..
‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटाचे बजेट जवळपास आठ कोटी रुपयांच्या आसपास आहे, तर ‘मुंबई पुणे मुंबई २’ चित्रपटही साडेसहा ते सात कोटी रुपये खर्चून तयार झाला आहे. या दोन्ही चित्रपटांचे गणित पाहता आणि मराठी चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता केवळ या दोन आठवडय़ांत पंधरा ते वीस कोटी पणाला लागले आहेत, तर त्यांच्याविरुद्ध उभ्या असलेल्या ‘प्रेम रतन धन पायो’चे बजेटच शंभर कोटींचे असल्याने सलमान खानकडून तिकीटबारीवर दोनशे नाही, तर थेट तीनशे कोटींची अपेक्षा साहजिकच आहे. त्यामुळे या वर्षी हिंदी चित्रपटाला मराठीशी स्पर्धा करावी लागणार असल्याचे दिसते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This year marathi films make diwali