राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत्या १२ डिसेंबर रोजी ७५ वर्षे पूर्ण करत आहेत. ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’च्या बारामती शाखेने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी आपले निमंत्रण अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला दिले आहे. त्यामुळे पवार यांना अमृतमहोत्सवी वर्षपूर्तीची भेट म्हणून आगामी ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बारामती येथे होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
घुमान येथे झालेल्या ८८ व्या साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी पुढील ८९ व्या साहित्य संमेलनासाठी विविध ठिकाणांहून निमंत्रणे आली असल्याचे सांगण्यात आले होते. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनीही पुढील साहित्य संमेलन भरविण्यासाठी निमंत्रण दिले होते. नाईक यांच्यासह मराठवाडा साहित्य परिषद उस्मानाबाद शाखा, कलारंग संस्था-पिंपरी चिंचवड, डी. वाय. पाटील संस्था-पिंपरी चिंचवड, कामगार साहित्य संघ-पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र साहित्य परिषद-सातारा या संस्थांची निमंत्रणे महामंडळाकडे आली होती. त्यात आता महाराष्ट्र साहित्य परिषद-बारामतीची भर पडली आहे.
बारामती येथे आजवर एकही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालेले नाही, ही बारामतीची निवड करण्यासाठी जमेची बाजू होऊ शकते. यापूर्वी अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलन येथे झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि बारामतीकर असलेले शरद पवार यांना अमृतमहोत्सवी वर्षपूर्तीची भेट म्हणून यंदाचे संमेलन बारामती येथे होण्यासाठी महामंडळाकडे ‘आग्रह’ धरला जाऊ शकतो. गेल्या काही वर्षांपासून साहित्य संमेलने वजनदार राजकीय नेते आणि त्यांच्या ताब्यात असलेल्या संस्थांकडे/पदाधिकाऱ्यांकडे गेली आहेतच. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हीच मंडळी संमेलनाचे आयोजन करत असतात. त्यामुळे यंदाचे साहित्य संमेलन बारामती येथे भरविण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
संमेलन कुठे घ्यायचे ते अद्याप नक्की झालेले नाही. बारामतीच्या नावाची चर्चा असली तरी तो निर्णय महामंडळ किंवा महामंडळाचे पदाधिकारी घेत नाहीत. त्यासाठी एक स्वतंत्र संमेलन स्थळ निवड समिती स्थापन केली जाते. विविध ठिकाणांहून आलेल्या निमंत्रणांचा विचार करून ही समिती त्या त्या ठिकाणी भेट देऊन सर्व बाबींचा आढावा घेते आणि त्यानंतरच संमेलन स्थळाची निवड केली जाते, असे महामंडळाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, अखिल भारतीय महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांचा प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क होऊ शकला नाही

Story img Loader