मुंबई : यंदाच्या दमदार पावसाळ्याचा शेती आणि संलग्न क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला. गत आर्थिक वर्षांतील ३.३ टक्के विकास दर होता, यंदा तो ८.७ टक्क्यांवर जाण्याचा अंदाज आहे. खरीप, रब्बी हंगामातील विविध पिकांसह पालेभाज्या आणि फळांच्या उत्पादनात उच्चांकी वाढीचा अंदाज आहे.
यंदाच्या पावसाळ्यात राज्यात सरासरीच्या ११६.८ टक्के पाऊस पडला. अपवाद वगळता सर्वच जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी पाण्याची उपलब्धता चांगली राहिली. त्यामुळे खरीप हंगामातील क्षेत्र गतवर्षाच्या तुलनेत ०.६ टक्क्यांनी वाढून १५७.३९ लाख हेक्टरवर गेले. रब्बी हंगामाचे क्षेत्र गतवर्षाच्या तुलनेत सात टक्क्यांनी वाढून ६२.८१ लाख हेक्टरवर गेले. उन्हाळी हंगामात ३.९७ लाख हेक्टरवर लागवड झाली. त्यामुळे अन्नधान्यांसह कृषी उत्पादनात वाढीचा अंदाज आहे.
अल्प भूधारक शेतकरी वाढले
राज्यात शेतकरी खातेदारांची संख्या १७१.११ लाख असून, शेतीयोग्य जमीन २१०.७९ हेक्टर आहे, तर प्रति शेतकरी जमीन धारणा १.२३ हेक्टरपर्यंत खाली आली आहे. अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांकडे सरासरी १.२४ हेक्टर शेतजमीन आहे. अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांकडे सरासरी १.७६ हेक्टर शेतजमीन आहे. महिला शेतकऱ्यांकडे सरासरी १.२२ हेक्टर शेतजमीन आहे.
मका उत्पादनात विक्रमी वाढ
राज्यात २०२४ – २५ मध्ये सर्व हंगामात मिळून एकूण ११ लाख २१ हजार ५८ हेक्टरवर मका लागवड करण्यात आली. लागवड गतवर्षाच्या तुलनेत २३.३ टक्क्यांनी वाढली असून, उत्पादन १६८ .५ टक्क्यांनी वाढून ३८.६९ लाख टनांवर जाण्याचा अंदाज आहे. मक्यापासून इथेनॉल निर्मितीला चालना दिल्याचा चांगला परिणाम मका लागवडीवर झाल्याचे दिसून येत आहे.
उत्पादनात वाढ अपेक्षित
तृणधान्य : ४९.२ टक्के
कडधान्य : ४८.१ टक्के
तेलबिया : २६.१ टक्के
कापूस : १०.८ टक्के
(फलोत्पादन पिकाखालील क्षेत्र २१.७४ लाख हेक्टरवर गेले असून, फलोत्पादन एकूण ३२६.८८ लाख टनांवर जाण्याचा अंदाज आहे. मात्र, उसाच्या उत्पादनात ६.६ टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज आहे.)