शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा ४० टक्के जास्त पाणीसाठा उपलब्ध असून सरासरीच्या ८० टक्के पाऊस पडला तरी तलाव भरतील, असा दिलासा महापालिकेकडून देण्यात आला आहे.
पाणीपुरवठा करण्यात मुख्य भूमिका बजावणारे वैतरणा व भातसा या दोन्ही जलाशयात पाण्याची पातळी चांगली आहे. वैतरणा तलावात ९९ दिवसांचा तर भातसामध्ये ७७ दिवसांचा पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी ७ मे रोजी सर्व तलावांत एकूण २ लाख ६९ हजार २२३ दशलक्ष लिटर पाणीसाठा होता. या वेळी त्यापेक्षा ४० टक्के जास्त म्हणजे ३ लाख ६५ हजार ६७१ लिटर दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणीकपातीला तोंड द्यावे लागणार नाही, असे अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांनी सांगितले. हवामान खात्याने या वर्षी सरासरीपेक्षा सहा टक्के कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, सध्याची पाण्याची स्थिती पाहता २० टक्केकमी म्हणजेच ८० टक्के पाऊस पडला तरी तलाव भरतील, असे पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पाणीपुरवठय़ाची स्थिती एवढी उत्तम असताना पालिका कृत्रिम पावसाच्या प्रयोगावर लाखो रुपये खर्च करण्याचा का प्रयत्न करतेय, असा मुद्दा भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी स्थायी समितीत व्यक्त केला. कृत्रिम पावसाबाबत नवीन तंत्रज्ञानाची माहिती मागवण्यात आली आहे, मात्र या वर्षी गरज नसल्यास तो प्रयोग केला जाणार नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’बाबत पालिका उदासिन
अपुऱ्या पावसासाठी कृत्रिम पावसाच्या प्रयोगावर कोटय़वधी रुपये खर्च करण्यास पालिका प्रशासन तयार असले तरी अल्पनिधीत करता येणाऱ्या रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष आहे. प्रत्येक नव्या इमारतीसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे आवश्यक असताना नेमक्या किती इमारतींनी ही योजना राबवली आहे, याबाबतची माहिती प्रशासन देण्यास तयार नाही. एकीकडे करोडो रुपयांचे प्रकल्प उभारत असताना पालिका या विभागाबद्दल कमालीची उदासीन आहे, यशस्वी प्रयोगांची नाही, तर रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग झाला आहे, अशा ठिकाणांची माहितीही पालिकेकडे नाही, असा आरोप मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी केला.