मोकळ्या आकाशाखाली आणि अथांग पसरलेल्या समुद्रावर लहरत्या लाटांची मजा घ्यायची, कानावर पडणारे मधुर संगीताचे सूर आणि चमचमत्या चांदण्यात आपल्या माणसांबरोबर जेवणाचा आनंद घेत नवीन वर्षांचे जल्लोषात स्वागत करायचे, असा सुंदर अनुभव पर्यटकांना देण्यासाठी ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा’ने (एमटीडीसी) शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, काही परवानग्या न मिळाल्याने ‘गेट वे ऑफ इंडिया’वरची ही चांदण्या रात्रीतील बोटींवरची पार्टी या वर्षीही पर्यटकांना अनुभवता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘गेट वे ऑफ इंडिया’च्या परिसरात समुद्रकिनारी रांगेत उभ्या असणाऱ्या बोटी पर्यटकांना समुद्राची सफर घडवून आणतात. याच बोटींमध्ये नववर्षांसाठी म्हणून अनेक पाटर्य़ा, कार्यक्रम दूर समुद्रात रंगले आहेत. २६/११चा हल्ला झाल्यानंतर मात्र सुरक्षेच्या कारणास्तव या बोटींवरच्या या पाटर्य़ावर बंदी घालण्यात आली होती. या वर्षी पुन्हा एकदा चांदण्या रात्रीतील ही खास सफर ‘गेट वे’वर मुंबईकरांना अनुभवता यावी, यासाठी ‘एमटीडीसी’ने प्रयत्न सुरू केले होते. अत्यंत सुंदर अशा या नववर्षांनिमित्तच्या सागरी अनुभवासाठी ‘एमटीडीसी’ने पोलिसांकडून परवानगी मिळवली होती, मात्र ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’कडून आवश्यक असणारी परवानगी त्यांना न मिळाल्याने त्यादृष्टीने पुढचे पाऊल उचलले नव्हते. अशा प्रकारे बोटीवर कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला परवानगी देण्यात आलेली नसल्याने ही कल्पनाच रद्द झाली असल्याचे ‘गेटवे एलिफंटा जल वाहतूक सहकारी संस्था मर्यादित’ या संस्थेच्या सूत्रांनी सांगितले.
नववर्षांचे स्वागत करण्यासाठी गेटवे परिसरात येणाऱ्या पर्यटकांना अधिकाधिक या फेरीबोटींकडे आकर्षित करत त्यांना चांगले मानधन मिळवून देण्याचा ‘एमटीडीसी’चा उद्देश होता.
३१ डिसेंबरपासून संध्याकाळी साडेसहा ते रात्री साडेदहा या वेळेत वेगवेगळ्या सुपर डीलक्स फेरीबोटींवर पर्यटकांना घेऊन त्यांना दोन तासांची सागरी सफर घडवायची. या सागरी सफरीत संगीत, मनोरंजनात्मक कार्यक्रम, बोटीवर जेवण असा खास बेतही आखण्यात आला होता. मात्र परवानग्यांअभावी अडकलेला हा प्रस्ताव पुढे नेण्यासाठी काही हालचाली सुरू केल्या आहेत का?, यासंदर्भात ‘एमटीडीसी’च्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा