मुंबई : ढोल – ताशांचा गजर, लेझीम पथक व ध्वज पथकांची लगबग, लक्षवेधी चित्ररथ आणि पारंपरिक पेहरावात सहभागी झालेल्या युवा वर्गाच्या उत्साही गर्दीने यंदाही मुंबईनगरी दुमदुमणार आहे. गिरगावमधील स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानची हिंदू नववर्ष स्वागतयात्रा म्हणजेच प्रसिद्ध ‘गिरगावचा पाडवा’ हा यंदा ‘मातृभाषेला घालू साद, माय मराठी अभिजात’ संकल्पनेवर आधारित आहे. गुढीपाडव्याला रविवार, ३० मार्च रोजी गिरगावातील फडके श्री गणपती मंदिरापासून गुढी पूजनाने सकाळी ८ वाजता या स्वागतयात्रेला सुरुवात होईल. या स्वागतयात्रेचे यंदा २३ वे वर्ष असून मातृभाषेचा जागर आणि मायमराठीच्या अभिजाततेचा गौरव स्वागतयात्रेच्या माध्यमातून होणार आहे.

मूर्तिकार गितेश पवार आणि गौरव पवार यांनी साकारलेल्या पर्यावरणस्नेही २० फूट उंच ज्ञानोबा माउलींच्या हातात यात्रेची मुख्य गुढी असेल. तसेच मुंबईतील अनेक प्रसिद्ध ढोलताशा पथकांच्या वादनाने गिरगाव दुमदुमणार आहे. ‘मातृभाषेला घालू साद, माय मराठी अभिजात’ संकल्पनेला अनुसरून गिरगावसह मुंबईतील विविध मंडळे आणि संस्थांच्या कलाकृती पाहायला मिळणार आहेत. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महाराणी ताराराणी यांच्या कार्यावर आधारित महाराष्ट्र शासनाचा चित्ररथही लक्ष वेधून घेणार आहे. या स्वागतयात्रेत पन्नासहून अधिक कलाकृती आणि चित्ररथ पाहायला मिळणार आहेत. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पेहरावातील दुचाकीस्वार युवतींचे आदिशक्ती पथक, युवकांचे युवाशक्ती पथक, गिरगाव कलामंचतर्फे संस्कारभारती रांगोळ्या, तसेच रंगशारदातर्फे स्वागतयात्रेच्या मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या आणि शेवटी यात्रेदरम्यानचा कचरा स्वच्छ करणारे संत गाडगेबाबा स्वच्छता पथक ही या स्वागतयात्रेची मुख्य वैशिष्ट्ये असणार आहेत.

स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे सेंटॅक कॉर्पोरेशनचे संचालक चंद्रगुप्त (हर्षद) भिडे यांच्या अध्यक्षतेखाली स्वागत समिती तयार केली असून स्वागतयात्रेची जय्यत तयारी सुरू आहे. या स्वागतयात्रेतील एक महत्वाचा टप्पा म्हणून शुक्रवार, १४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता गिरगावमधील साहित्य संघ मंदिर येथे प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मराठी अभिमान गीत’ सामूहिक गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे. तसेच संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. अपर्णा बेडेकर यांनी संपादित केलेला मराठीच्या अभिजाततेची वैशिष्ट्ये सांगणारा गुढी पाडवा विशेषांक ‘चैत्र स्वागत’ रविवार, २३ मार्च रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे.

Story img Loader