मुंबई : उत्तीर्णांचे वाढलेले प्रमाण आणि त्याचवेळी अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या यांमुळे मुंबई विभागांत विज्ञान शाखेच्या प्रवेशाचे पात्रता गुण (कट ऑफ) वाढण्याची शक्यता आहे. त्याचवेळी मुंबईत सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेल्या वाणिज्य शाखेतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची संख्या घटल्यामुळे त्याच्या प्रवेशासाठीची स्पर्धा किंचित कमी होऊ शकेल. यंदा मुंबई विभागाचा एकूण निकाल ९१.९५ टक्के लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यंदा मुंबई विभागाचा निकाल राज्यात सर्वात कमी म्हणजे ९१.९५ टक्के लागला आहे. मात्र, विभागाच्या निकालात गतवर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी वाढ झाली असून २०२३ साली निकालाची एकूण टक्केवारी ८८.१३ आणि २०२२ साली ९०.९१ इतकी होती.

मुंबई विभागात ठाणे, रायगड, पालघर, बृहन्मुंबई, मुंबई पश्चिम उपनगरे आणि मुंबई पूर्व उपनगरे यांचा समावेश आहे. यंदा मुंबई विभागातून इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी एकूण ३ लाख २१ हजार ११६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ लाख १९ हजार ९१० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि २ लाख ९४ हजार १५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदा विभागाच्या विज्ञान, कला आणि व्यावसायिक शिक्षण शाखेच्या निकालात वाढ झाली आहे तर विभागाचा वाणिज्य शाखेतील निकाल काहिसा घटला आहे.

गेल्यावर्षी मुंबईतील एकूण उत्तीर्णांची टक्केवारी कमी झाली असली तरी विशेष श्रेणी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशासाठी चढाओढ होती. काही महाविद्यालयांतील प्रवेशासाठी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुणही अपुरे ठरले. प्रवेशाच्या या स्पर्धेत यंदा अधिकच वाढ होण्याची शक्यता आहे. यंदा विशेष श्रेणी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही जवळपास ७ हजारांनी वाढली आहे. यंदा मुंबई विभागात ४५ हजार ९७२ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी मिळाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा विज्ञान शाखेतील पदवी प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे तेथे प्रवेशासाठी चुरस असेल. विज्ञान शाखेतील पदवी प्रवेश पात्र विद्यार्थी यंदा १ लाख १२ हजार ९७९ आहेत तर गेल्यावर्षी ९६ हजार ४२४ होते. विज्ञान शाखेच्या निकालाची वाढ ५ टक्के आहे. वाणिज्य आणि कला शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या मात्र गेल्यावर्षीच्या तुलने घटली आहे. वाणिज्य शाखेतील उत्तीर्णांची संख्या १ लाख ४३ हजार ६२८ असून गेल्यावर्षी ही संख्या १ लाख ५१ हजार १९४ होती. कला शाखेच्या रिक्त जागांमध्येही यंदा भर पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>घाटकोपर, भांडुप व मुलुंडमध्ये शुक्रवारी पाणीपुरवठा बंद

यंदा मुंबई विभागाच्या कला शाखेच्या निकालाची टक्केवारी वाढली असली तरी या शाखेतून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काहिशी घटल्यामुळे प्रवेशासाठी पात्र विद्यार्थीही गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहेत. यंदा ३३ हजार ८१२ विद्यार्थी कला शाखेतून उत्तीर्ण झाले आहेत. गेल्यावर्षी ही संख्या ३८ हजार ३७३ होती.

पाच वर्षांचा निकाल

२०२३ – ९१.२५ टक्के

२०२२ – ९४.२२ टक्के

२०२१ – ९९.६३ टक्के

२०२०- ९०.६६ टक्के

२०१९ – ८५.८८ टक्के

गुणपडताळणी, छायाप्रतीबाबत…

विद्यार्थ्यांना स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने मिळवलेल्या गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या http:// verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळाद्वारे स्वत: किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी २२ मे ते ५ जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येईल. उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. तसेच छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

रायगड अव्वल, बृहन्मुंबई सर्वात कमी

इयत्ता बारावीच्या निकालात मुंबई विभागाअंतर्गत रायगड जिल्ह्याचा सर्वाधिक ९४.८३ टक्के निकाल लागला आहे. तर सर्वात कमी बृहन्मुंबई ८९.०६ टक्के इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच पालघर जिल्ह्यात ९३.५१ टक्के, ठाण्यात ९२.०८ टक्के, मुंबई पश्चिम उपनगरमध्ये ९१.८७ टक्के, मुंबई पूर्व उपनगरमध्ये ९०.३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

शाखानिहाय निकाल

कला – ८५.८८ टक्के

वाणिज्य – ९२.१८ टक्के

विज्ञान – ९७. ८२ टक्के

व्यवसाय अभ्यासक्रम – ८७.७५ टक्के

आयटीआय – ८७.६९ टक्के

तनिषा बोरामणीकरला शंभर टक्के

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगिरी महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी तनिषा सागर बोरामणीकरने सहाशेपैकी सहाशे गुण मिळवत देदीप्यमान यश संपादित केले. तनिषा ही उत्तम बुद्धिबळपटूही आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिने बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. तिची आई सनदी लेखापाल (सीए), तर वडील आर्किटेक्ट आहेत. यशाचे गमक सांगताना तनिषा म्हणाली, की आपण नियोजनबद्ध अभ्यास केला. दररोज किती अभ्यास करायचा, हे निश्चित केले आणि तेवढे पूर्ण केल्याशिवाय अन्य काहीही करायचे नाही, असे ठरवले. त्यातूनच यश मिळाले.

,९०,५७०

७५ टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळालेले विद्यार्थी

, ८०,६३१

६० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळालेले विद्यार्थी

,२६,४२५

४५ टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळालेले विद्यार्थी

मुंबई विभागाची शाखानिहाय टक्केवारी

● विज्ञान – ९६.३५ (९१.१८)

● वाणिज्य – ९०.८८ (८८.१५)

● कला – ८३.५६ (८०.८७)

● व्यवसाय शिक्षण – ९०.८५ (९१.५८)

(कंसात गेल्यावर्षीची टक्केवारी)

दृष्टिक्षेपात निकाल

नोंदणी केलेले नियमित विद्यार्थी – १४ लाख ३३ हजार ३७१

परीक्षा दिलेले नियमित विद्यार्थी – १४ लाख २३ हजार ९७०

उत्तीर्ण झालेले नियमित विद्यार्थी -१३ लाख २९ हजार ६८४

उत्तीर्णांची टक्केवारी – ९३.३७

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This year there is a three percent increase in the results of the mumbai division amy