करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीने घेतला आहे.
या निर्णयाचे मुंबईतील बहुतांशी मंडळांनी स्वागत केले असून यंदाचा गणेशोत्सव झगमगाटाविना करण्याचा संकल्प केला आहे. विशेष म्हणजे गणेशगल्ली, लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदा वर्गणी न घेता उत्सव करण्याचे ठरवले आहे.
मुंबईत करोनाचा प्रसार वाढत असल्याने यंदाचा गणेशोत्सव कसा असेल याबाबत अनेकांना उत्सुकता होती; परंतु गणेशोत्सवातील संभाव्य धोके लक्षात घेत यंदाचा उत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी घेतला आहे. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदा स्थानिक रहिवाशांकडून वर्गणी घेणार नसल्याचे सांगितले.
‘करोनामुळे घराघरांत आर्थिक संकट आहे. त्यांना वर्गणीचा भार देणे योग्य नाही. त्यामुळे मंडळाच्या जमा रकमेतूनच यंदाचा उत्सव होईल. दरवर्षीसारखी भव्यता यंदा नसेल. शक्य तितक्या साधेपणाने यंदाचा उत्सव साजरा करण्यावर भर दिला जाईल,’ असे गणेशगल्ली मंडळाचे सचिव स्वप्निल परब यांनी सांगितले.
उंच मूर्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या खेतवाडीनेही या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘आजवर उंच मूर्ती बसवल्या, परंतु यंदा उंच मूर्ती आणण्यापेक्षा सामाजिक भान जोपासणे गरजेचे आहे. वेळ आली तर दोन फुटांची गणेशमूर्ती स्थापन करून उत्सव होईल. तरुण मुलांमध्ये प्रचंड उत्साह आहे; पण यंदा त्याला थोडा आवर घालावा लागेल,’ असे मुंबईचा सम्राट, ६ वी खेतवाडी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष किरण शिंदे यांनी सांगितले.
‘अद्याप शासनाचे आदेश आलेले नाहीत. त्यात आपल्याकडे मूर्तिकाम, मंडप, सजावट करणारा मजूर वर्ग परप्रांतीय असल्याने यंदा मजुरांची कमतरता भासेल. परिणामी दरवर्षीसारखा डामडौल उभा राहणार नाही. त्यामुळे प्रत्येक मंडळाला साधेपणानेच उत्सव करावा लागेल. अद्याप वर्गणीबाबत निर्णय झालेला नाही; परंतु लोकांवर भार येईल अशी भूमिका मंडळ कधीही घेणार नाही,’ अशी भूमिका चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष उमेश नाईक यांनी मांडली.
अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, शिवडी, परळ, खेतवाडी आणि मुंबईतील बऱ्याच मंडळांनी यंदा वर्गणी न आकारता साधेपणाने उत्सव करण्याचे ठरवले आहे.
संकटकाळात मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी कायम मदतीचा हात पुढे केला आहे. देशावर करोनाचे संकट असताना वाजतगाजत उत्सव साजरा करणे ही मुंबईची परंपरा नाही. साधेपणाने उत्सव साजरा करण्याच्या निर्णयाला मुंबईतील अनेक मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यंदाचा गणेशोत्सव हा आदर्श घडवणारा असेल.
– नरेश दहीबावकर , अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समिती