मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात देशात १०८ टक्के पाऊस झाला. सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांचे भरघोस उत्पादन होण्याचा अंदाज आहे. तांदळाचे विक्रमी १४१० लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे. निर्यातीवर कोणतेही निर्बंध नसल्यामुळे २१० लाख इतकी विक्रमी निर्यात होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत.

पश्चिम बंगाल तांदूळ उत्पादनात देशातील आघाडीवरील राज्य आहे. देशाच्या एकूण तांदूळ उत्पादनापैकी सुमारे १५ टक्के वाटा एकट्या पश्चिम बंगालचा असतो. त्या खालोखाल पंजाब, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू अग्रेसर आहेत. किनारपट्टीवरील राज्यांसह पंजाबमध्ये चांगले पाऊसमान असल्यामुळे तांदूळ उत्पादनात भरघोस वाढ होऊन यंदा, २०२४-२५ मध्ये १४१० लाख टन इतके विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. देशात २०२३ – २४ मध्ये १३७८ लाख टन आणि २०२२ – २३ मध्ये १३५७ लाख टन तांदूळ उत्पादन झाले होते.

हेही वाचा…मुंबई विमानतळावर पुन्हा ‘पॉफेक्ट’ उपक्रम

तांदूळ उत्पादनामध्ये चीन नंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. यंदा चीनमध्ये १४६० लाख तांदूळ उत्पादनाचा अंदाज आहे. गेल्या वर्षी २०२३ – २४ मध्ये १४४६ लाख टन उत्पादन झाले होते. एकूण जागतिक उत्पादनाचा विचार करता या वर्षी २०२४ – २५ मध्ये जगाचे एकूण तांदूळ उत्पादन ५३०४ लाख टनांवर जाण्याचा अंदाज आहे. २०२३ – २४ मध्ये ५२१५ लाख टन आणि २०२२ – २३ मध्ये ५१६० लाख टन तांदूळ उत्पादन झाले होते.

गेली दोन वर्षे देशातून तांदूळ निर्यातीवर विविध बंधने लादण्यात आली होती. बिगर बासमती पांढऱ्या तांदळावरील निर्यात बंदी केंद्र सरकारने उठवली आहे. बिगर बासमतीवरील २० टक्के निर्यात शुल्कही रद्द केले आहेत. त्यामुळे बिगर बासमती तांदळाची बंद असलेली निर्यात सुरू झाली आहे. यंदा उत्पादन चांगले असल्यामुळे निर्यातीसाठी तांदळाची उपलब्धताही चांगली आहे. निर्यातीतील अडथळेही दूर झाले असल्यामुळे निर्यातीमध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा…पोलिसाला धक्काबुक्की करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

निर्यात बंदीमुळे देशातून २०२३ – २४ मध्ये १७५ लाख टन आणि २०२२ – २३ मध्ये १७७ लाख टन तांदळाची निर्यात झाली होती. आता निर्यातीतील सर्व अडथळे दूर झाल्यामुळे तांदळाच्या निर्यातीला वेग आला आहे. आर्थिक वर्ष २०२४- २५ मध्ये २१० कोटी टन एवढी निर्यात होण्याची शक्यता आहे. जगातील तांदूळ उत्पादक देशांनी बिगर बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य कमी केले आहे. व्हिएतनामने २८ डॉलरने कमी करून ५३४ डॉलर प्रतिटन केला आहे. थायलंडने ६० डॉलरने कमी करून ५१७ डॉलर प्रतिटन केला आहे. पाकिस्ताने ५३ डॉलरने कमी करून ४८७ डॉलर प्रतिटन आणि भारताने ४९२ रुपये बिगर बासमतीचे किमान निर्यात मूल्य निश्चित केले आहे. त्यामुळे सुमारे ४० रुपये प्रतिकिलो रुपयांपेक्षा कमी दराने तांदळाची निर्यात करता येत नाही. त्यामुळे देशात प्रामुख्याने बिगर बासमती तांदळाची उपलब्धता चांगली राहून दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहण्याचा अंदाज तांदळाचे निर्यातदार राजेश शहा यांनी व्यक्त केला आहे.

तांदूळ उत्पादन, निर्यातीची स्थिती

देशात यंदा १४१० लाख टन उत्पादनाचा अंदाज

चीनमध्ये यंदा १४६० लाख तांदूळ उत्पादनाचा अंदाज

जागतिक तांदूळ उत्पादन ५३०४ लाख टनांवर जाण्याचा अंदाज

देशातून एकूण २१० लाख टन तांदूळ निर्यात होण्याचा अंदाज

बिगर बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य ४९२ डॉलर प्रतिटन