दहावीला विज्ञान विषयात ४० टक्क्यांहून कमी गुण मिळालेल्या बारावीच्या विज्ञान शाखेतील परीक्षार्थीना यंदा परीक्षेला बसण्याची राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना ही सवलत केवळ फेब्रुवारी-मार्च, २०१३च्या परीक्षेपुरती मिळणार असून, पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे.
दहावीला विज्ञान विषयात ४० टक्क्यांहून कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेश दिला जात नाही. मात्र, राज्यातील अनेक शिक्षण संस्थांनी तुकडय़ा टिकविण्यासाठी हजारो विद्यार्थ्यांना नियम डावलून विज्ञान शाखेत प्रवेश दिल्याचे बारावीच्या परीक्षा अर्जाची छाननीदरम्यान उघड झाले. अशा विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेतून परीक्षा देता येणार नाही, असे मंडळाने स्पष्ट केल्याने हजारो विद्यार्थ्यांचे धाबे दणाणले होते. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने २६ जानेवारीच्या अंकात दिले होते. तर या मुलांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे पत्र मंडळाने राज्य सरकारला पाठवले होते. त्यावर ‘सरकारने विशेषाधिकारांचा वापर करून फेब्रुवारी-मार्च, २०१३पुरती या विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेतून परीक्षा देण्याची सवलत दिली आहे,’ असे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सांगितले.
या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास पुनर्परीक्षेसाठी ही सवलत मिळणार नसल्याने, पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रयत्न करावे लागतील. विद्यार्थ्यांची दिशाभूल करणाऱ्या संबंधित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाई करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला व शिक्षण संचालकांना दिले आहेत.

Story img Loader