खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या मंत्री अब्दुल सत्तारांच्याविरोधात आज महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत समाजवादी पार्टीच्या खासदर जया बच्चनही होत्या. राज्यपालांना भेटून आल्यानंतर या महिला नेत्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी खासदार जया बच्चन म्हणाल्या, “आता आम्ही सर्वांनी मिळून राज्यपालांची भेट घेतली. आम्हाला तर राष्ट्रपतींना जाऊनही भेटायचं आहे. पुढील महिन्यात आम्ही नक्कीच त्यांची भेट घेणार आहोत. मुद्दा असा आहे की, भगिनींचा अपमान झालेला चालणार नाही आणि आम्ही सहन करणार नाही. मला असं वाटतं मग कोणतेही सरकार असो, कोणत्याही राज्यातलं सरकार, जर कोणही राजकारणी व्यक्ती किंवा विशेषकरून महिलांबाबत कोणत्याही प्रकारे चुकीचं विधान केलं, त्यांचा अपमान केला, अश्लिल बोलत असेल तर अशा लोकांना राजकारणातून बाहेर काढलं पाहिजे आणि एक उदाहरण निर्माण केलं पाहिजे, की राजकारणात अशा लोकांसाठी काहीच जागा नाही. राजकारणाची पातळी उंचवायची आहे, त्यामुळे भगिनींचा अपमान करणे बंद करा.”

याचबरोबर “राज्यपालांनी आम्हाला हे सांगतले की, राज्यपालांची एक मर्यादा असते, त्यापलिकडे ते जाऊ शकत नाहीत. ही खरोखर दु:खद बाब आहे. कारण ते तर राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी जर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे, तर मुख्यमंत्र्यांनी हे सांगायला हवं की आम्हाला राज्यपालांकडून हे पत्र आलं आहे आणि आम्हाला यावर बोलण्यास सांगितलं आहे व त्यांनी बोलावं. ज्यांनी चुकीचं काम केलंय त्यांना बाहेर काढावं. यामुळे राजकारणाचं नाव खरब होतय, केवळ महिलांचं नाही. महिलांचा अपमान तर तुम्ही रोजच करत आहात. प्रत्येक दुसऱ्या दिवशी बलात्कार होत आहेत, शासानाकडून काही बोलल्या जात नाही. कालही उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये बलात्काराची घटना घडली. उत्तर प्रदेशमध्ये तर हे आता रोजचेच झाले आहे. ही खूप चुकीची गोष्ट आहे. हे प्रत्येक सरकारने यावर कारवाई केली पाहिजे. तुम्ही महिलांवर अशाप्रकारे अत्याचार कसा काय करू शकता?” असंही जया बच्चन म्हणाल्या.

याशिवाय, “भगिनींवर अत्यार बंद झाला पाहिजे. आम्ही हे सहन करणार नाही. आता महिला खूप बलशाली होत आहेत. त्यांच्या हातात, शब्दांमध्येही ताकद आहे.” असंही जया बच्चन यांनी यावेळी सांगितलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Those who insult women use abusive language should be thrown out of politics jaya bachchan msr