लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : सार्वजनिक स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांवर होणाऱ्या दंडात्मक कारवाईत आता तंत्रज्ञानाचा आधार घेतला जाणार आहे. मंगळवारपासून पालिकेच्या ‘ए’ विभागात स्वच्छतेसंदर्भातील प्रकल्प सुरु करण्यात आला असून आता स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने दंडाची पावती मिळणार आहे. प्रशिक्षित क्लिन अप मार्शल कारवाई करताना आकारलेल्या दंडाची पावती हाताने न लिहिता मोबाईल ऍपद्वारे छापील पावती देणार आहेत. तसेच, नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने दंड भरण्याचाही पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

स्वच्छ मुंबई अभियानांतर्गत अधिकाधिक लोकाभिमुख तसेच तंत्रज्ञानस्नेही पुढाकार घ्यावेत. तसेच, अधिकाधिक पारदर्शक यंत्रणा राबवावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांनी यंत्रणांना दिले आहेत. त्यानुसार, माहिती तंत्रज्ञानावर आधारित दंडात्मक आकारणीची सुरुवात क्लीन अप मार्शलच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या पथदर्शी प्रकल्पाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन संपूर्ण मुंबईत या तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. स्वच्छताविषयक नियमांचे उल्लंघन केल्यावर होणाऱ्या दंडात्मक वसूलीसाठी डिजीटल व ऑनलाईन पद्धतीने कार्यवाही करण्याचे मोबाईल ऍप महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने तयार केले आहे. प्रत्येक प्रशासकीय विभागात ३० याप्रमाणे संपूर्ण मुंबईत मिळून सुमारे ७०० क्लीन अप मार्शल कार्यरत आहेत. या सर्वांना प्रशिक्षण देऊन प्रायोगिक तत्त्वावर डिजीटल कारवाई सुरु करण्यात येणार आहे. तसेच, कार्यवाही डिजीटल झाल्यामुळे महानगरपालिकेला कोणत्या दिवशी किती रक्कम दंड आकारणी झाली, कोणत्या जागेवर, कोणत्या विभागात, कोणत्या प्रकारासाठी दंड आकारणी झाली, याचे अचूक तपशील कळू शकतील.

आणखी वाचा- वंचितच्या धुळे येथील उमेदवाराची स्वेच्छानिवृत्तीची मागणी, मागणीला केंद्र सरकारचा विरोध

नागरिकांना मिळालेल्या पावतीवर महानगरपालिकेचे बोधचिन्ह तसेच पावती क्रमांक असेल. महानगरपालिकेच्या विभागाचे नाव, दिनांक, वेळ तसेच कारवाई केलेल्या जागेचा अक्षांश, रेखांशदेखील असेल. परिणामी, दंड आकारणी प्रक्रियेतील गैरव्यवहार रोखले जातील. तसेच, नागरिक आणि मार्शल यांच्यातील वादाचे प्रसंगही टळतील. क्लीन अप मार्शलकडे असलेल्या मोबाईलमध्ये महानगरपालिकेने तयार केलेले क्लीन अप मार्शल सिस्टीम ऍप असेल. यामध्ये स्वच्छतेचे नियम मोडल्याबद्दल आकारावयाची निश्चित रक्कम आधीपासूनच समाविष्ट असेल. सध्याच्या प्रचलित पद्धतीप्रमाणे किमान १०० रूपये, तर कमाल १ हजार रूपये इतका दंड आकारण्याचे अधिकार क्लिन अप मार्शल यांना असणार आहेत. नागरिकांनी या योजनेला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. सुधाकर शिंदे यांनी व्यक्त केले.

Story img Loader