साचलेल्या स्वच्छ पाण्यात मलेरिया-डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होते, याची माहिती देण्यासाठी पालिकेने जोरदार जनजागृती मोहीम हाती घेतली. मात्र तरीही शहरात रेल्वे, विमानतळ, नेव्ही आदी संस्थांच्या आवारातील हजारहून अधिक ठिकाणे डासांच्या वाढीसाठी पूरक असल्याचे पाहणीत आढळून आले. त्यामुळे महानगरपालिका आयुक्तांनी बैठक घेऊन संबंधित संस्थांच्या उच्चाधिकाऱ्यांना पाणी साठणाऱ्या ठिकाणांचा बंदोबस्त करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे.
शहरात २०१० मध्ये झालेल्या मलेरियाच्या उद्रेकात मुंबईत १३९ मृत्यूमुखी पडले होते. त्यानंतर डासांचा उत्पत्ती रोखण्यासाठी पाणी साठणाऱ्या जागा शोधून तेथे डासप्रतिबंधक उपाययोजना करण्याचे योजना युद्धपातळीवर राबवण्यात आली. मात्र शहरातील अनेक जागा या बीपीटी, विमानतळ, म्हाडा, एमएमआरडीए, रेल्वे, नेव्ही, आर्मी इ. संस्थांच्या अखत्यारीत येतात. त्या जागांवरील पाण्याच्या साठय़ांमध्ये वाढणाऱ्या डासांबाबत कारवाई होत नसल्याने पालिकेने न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर गेली दोन वर्षे संबंधित संस्थांच्या जागेमधील डासप्रतिबंधक योजनांची माहिती घेण्याचे काम पालिका अधिकारी वॉर्डपातळीवर करत असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी दिली.
इमारतींच्या टेरेसवर लावलेल्या पाण्याच्या टाक्यांची झाकणे लावलेली नव्हती, टायर-डबे अशा पाणी साचणाऱ्या वस्तू पडलेल्या होत्या, विहिरी, लहान तलाव यातही डासप्रतिबंधक औषधे मारण्यात आली नव्हती. या ठिकाणांमुळे मलेरिया तसेच डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या डासांची संख्या वाढून आजार पसरू शकतात, असे मुख्य आरोग्य अधिकारी अरूण बामणे यांनी सांगितले.

Story img Loader