मुंबई : जगभरातील विज्ञान व तंत्रज्ञानप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या आयआयटी मुंबईच्या ‘टेकफेस्ट’चे २८ वे पर्व सध्या पवई संकुलात सुरू आहे. या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी हजारो नागरिकांनी भेट दिली. मुंबईसह ग्रामीण भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

यंदाचा ‘टेकफेस्ट’ हा ‘शाश्वत नावीन्यपूर्ण सचेतनता – जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता शाश्वतता पूर्ण करते’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आहे. सदर संकल्पनेच्या अनुषंगाने विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित विविधांगी प्रकल्पही लक्षवेधी ठरत आहेत. ‘टेकफेस्ट’च्या मध्यवर्ती संकल्पनेच्या अनुषंगाने आयआयटी मुंबईच्या संकुलात करण्यात आलेली सजावट, विशेषतः प्रवेशद्वार आणि जागोजागी उभारण्यात आलेले रोबोट व इतर प्रतिकृती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत.

हेही वाचा…संकटकाळी मदतीसाठी मानवरहित विमान, ड्रोन ‘आयआयटी मुंबई’च्या तंत्रज्ञान महोत्सवात ‘टीमरक्षक’

तर सेल्फी पॉइंटवर छायाचित्रे काढण्यासाठीही नागरिक गर्दी करत आहेत. अनेकजण प्रकल्पांची छायाचित्रे काढण्यात मग्न होते. तर काहींना पवई संकुलात स्वतःची छायाचित्रे काढण्याचा मोह आवरत नव्हता. ‘टेकफेस्ट’मधील विविध प्रकल्प पाहण्यासाठी आणि कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानप्रेमी सकाळपासूनच हजेरी लावत असून मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरील पदपथापर्यंत रांगा लागली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करण्यात येत होती. विविध प्रकल्पांबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता दिसत होती.

Story img Loader