ठाणे, कल्याण, रायगड येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांची हजारो पदे रिक्त असून ती तातडीने भरण्याची मागणी होत आहे. मे, २०११पर्यंत रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ५७४, नगरपालिका शाळांमध्ये ३२, ठाणे जिल्हा परिषद शाळांमध्ये ६१४, नगरपालिका शाळांमध्ये ४६, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका शाळांमध्ये ३७, नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये २२, भिवंडी महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षकांची ६० पदे अशी एकूण १,३८५ पदे रिक्त होती.
नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद शाळांमध्ये गोरगरीबांची मुले शिकतात. त्यामुळे, या शाळा शिक्षकाअभावी ठेवणे म्हणजे या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण नाकारणे होय. स्थानिक स्वराज्य शाळांमधील शिक्षकांच्या नियुक्तीसाठी ‘सामाइक प्रवेश परीक्षा’ घेतली जाते. पण, २०१० नंतर ही परीक्षा झालेली नाही. परिणामी शाळांमधील रिक्त शिक्षकांची पदेही भरली गेलेली नाहीत. अपुऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
त्यातच सप्टेंबर, २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या डीटीएड (डीएड) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेस बसलेल्या ९१ हजार विद्यार्थ्यांपैकी सुमारे ६५ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच पूर्वी उत्तीर्ण झालेले अनेक डीटीएड विद्यार्थी शिक्षक नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. एकटय़ा मुंबई विभागात शिक्षकांची एक हजार ३८५ पदे रिक्त असल्याने ती लवकरात लवकर भरण्यात यावी, अशी मागणी आमदार रामनाथ मोते यांनी केली. मोते यांनी या संदर्भात शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.