कुलदीप घायवट, लोकसत्ता

मुंबई : नाताळनिमित्ताने मिळालेल्या सलग सुट्टय़ांमुळे बोरिवलीस्थित संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात, भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय येथे पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. राष्ट्रीय उद्यानातील आणि राणी बागेतील पशुपक्ष्यांना पाहून दैनंदिन थकवा विसरून मनमुराद आनंद लुटताना दिसून येत आहेत.

मुंबईसारख्या महानगराला लागूनच राष्ट्रीय उद्यान आणि प्राणिसंग्रहालय असल्याने कमी प्रवास करून, जास्त वेळ निसर्गाच्या सान्निध्यात घालवायला मिळतो. त्यामुळे एका दिवसाच्या सहलीसाठी राष्ट्रीय उद्यान आणि राणी बाग या दोन ठिकाणी जाण्यास पर्यटक पसंती दर्शवत आहेत. गेल्या आठवडय़ापासून हजारोंच्या संख्येने पर्यटकांची गर्दी होत आहे. गेल्या चार वर्षांपासून राष्ट्रीय उद्यानातील सिंह सफारी बंद होती. मात्र, गुजरातहून एक सिंहाची जोडी आणल्याने बंद असलेली सिंह सफारी सुरू झाली आहे. त्यामुळे नव्या सिंहाच्या जोडीला पाहण्यासाठी पर्यटकांची पुन्हा वर्दळ वाढू लागली आहे.

राणीबागेचे नूतनीकरण झाल्याने पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक दिसणारी राणीबाग पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढली. राणी बागेतील मुख्य आकर्षण असलेले पेंग्विन पाहण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पर्यटकांच्या रांगा लागलेल्या असतात. यासह वाघ, बिबटय़ा, अस्वल, पाणघोडा, हत्ती, विविध पक्षी पाहण्याची, निसर्गरम्य वातावरणात फिरण्याची मज्जा पर्यटक लुटत असल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रीय उद्यानातील सिंह सफारी, नौका विहाराला पसंती

पश्चिम रेल्वे मार्गावरील गर्दीच्या स्थानकांपैकी एक असलेल्या बोरिवली स्थानकापासून सुमारे एक किमी अंतरावर राष्ट्रीय उद्यान उभे आहे. त्यामुळे नाताळच्या सुट्टय़ांमध्ये दररोज देशातील पर्यटकांसह विदेशी पर्यटकांची संख्याही मोठय़ा प्रमाणात असल्याचे दिसते. राष्ट्रीय उद्यानातील मुख्य आकर्षण हे सिंह सफारी असून दररोज १ हजारांहून अधिक तिकिट विकली जात आहेत तर एक लाखांहून अधिक महसूल राष्ट्रीय उद्यानाला मिळत आहे. नाताळच्या दिवशी १ हजार ३०० पर्यटकांनी तर गुरुवारी १ हजार ८५ पर्यटकांनी सिंह सफारीचा आनंद लुटला. सिंह सफारीसाठी नेहमी चार गाडय़ा वापरल्या जात होत्या. मात्र, आता एकूण सहा गाडय़ा वापरून पर्यटकांना वेळेत सिंह सफारी घडवली जात आहे. यासह नौका विहार करण्यासाठी रोज सुमारे १५० ते २०० जणांकडून तिकिटे आरक्षित केली जात आहेत. 

पेंग्विन पाहण्यासाठी गर्दी

मध्य रेल्वेच्या भायखळा स्थानकापासून पायी पाच ते दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या राणी बागेत पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. राणी बागेत पेंग्विन हे मुख्य आकर्षण असून, पेंग्विन कक्षाच्या बाहेर तिकिटे काढण्यासाठी पर्यटकांच्या लांबच्या लांब रांगा लागत आहेत. नाताळच्या दिवशी राणीच्या बागेत ३१ हजारांहून अधिक पर्यटकांनी भेटी दिल्या. तर, गुरुवारीही २३ हजारांहून अधिक पर्यटकांची राणी बागेत उपस्थिती होती. त्यामुळे दररोज ७ ते ११ लाखांहून अधिक महसूल प्रशासनाला मिळत आहे.

Story img Loader