मुंबई : गोव्यावरून मुंबईत येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची चिठ्ठी सापडल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणानंतर सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले. परंतु तपासणीत काहीच संशयास्पद सापडले नाही. याप्रकरणी एअरपोर्ट पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तक्रारदार अभिजीत सावंत एका खासगी विमान कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा) पदावर कार्यरत आहेत. त्यांना सोमवारी रात्री गोव्याहून मुंबईला येणाऱ्या विमानाच्या शौचालयात एक चिठ्ठी सापडली. त्यात काळजी घ्या, बॉम्ब असे लिहिण्यात आले होते. दुसऱ्या बाजूला सूड असे लिहिण्यात आले होते. दोन्ही मजकूर इंग्रजीत लिहिण्यात आले होते. विमान मुंबई विमानतळावर पोहोचण्यापूर्वी २० मिनिटे एका प्रवाशाला ती चिठ्ठी सापडली. त्याने तातडीने याबाबतची माहिती विमान कर्मचाऱ्यांना दिली. याबाबत वैमानिकाला सांंगितल्यानंतर त्यांनी विमानतळाशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर विमानतळावर बॉम्ब शोधक व नाशक पथक, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, विमानतळ सुरक्षा पथक तैनात करण्यात आले.

हेही वाचा…‘आयडॉल’च्या परीक्षा प्रवेशपत्रावरून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम, मुंबई विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, परीक्षा केंद्रांवर संभ्रमाचे वातावरण

विमान आयसोलेट बे येथे उभे करून सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आले. त्यानंतर विमानाची तपासणी केली असता कोणतीही संशयीत वस्तू सापडली नाही. याप्रकरणी संशयीत चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली असून सावंत यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निळ्या रंगाच्या शाई पेनाने धमकीचा संदेश लिहिण्यात आला होता. प्रवाशांमध्ये भीती निर्माण करण्याच्या हेतून आरोपीने हा प्रकार केला असून त्याबाबत विमानतळ पोलीस तपास करत आहेत.