मुंबई : पावसाळा सुरुवात झाल्यानंतर लेप्टो, डेंग्यू व गॅस्ट्रोच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. मात्र ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्याने काही लेप्टो, गॅस्ट्रो, स्वाइन फ्लू, चिकुनगुनिया या साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. हिवतापाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे मुंबईकरांना अद्यापही हिवताप धोका कायम असल्याचे दिसून येत आहे.
ऑगस्ट सुरू झाल्यानंतर हिवतापाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली. जुलैत मुंबईमध्ये हिवतापाचे ७२१ रुग्ण सापडले होते. त्या तुलनेत ऑगस्टच्या तीन आठवडय़ांत हिवतापाचे ७०४ रुग्ण सापडले तर ऑगस्टच्या प्रत्येक आठवडय़ात हिवतापाचे २२५ पेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. त्याचप्रमाणे ऑगस्टमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या अधिक असली तरी मागील तीन आठवडय़ांच्या तुलनेत या आठवडय़ात डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसते आहे.
ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात डेंग्यूचे १५७, दुसऱ्या आठवडय़ात २४० तर तिसऱ्या आठवडय़ात ९८ रुग्ण सापडले आहेत. जुलैमध्ये डेंग्यूचे ६८५ रुग्ण सापडले होते. मुंबईत जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये लेप्टो, गॅस्ट्रो, हेपेटायटिस, चिकुनगुनिया आणि एच१ एन१ च्या रुग्णांमध्ये घट झाल्याची दिसून येत आहे.