महालक्ष्मी येथील हाजीअली दर्गा येथे दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली असून यासंदर्भातील धमकीचा फोन गुरुवारी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला. हा फोन उल्हासनगरमधून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या फोननंतर तत्काळ हाजीअली परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
हेही वाचा >>>मुंबई: खार स्थानकात एलीव्हेटेड डेक, स्कायवॉक, पादचारी पूल
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचे फोन येण्याचे सत्र सुरूच आहे. आता पुन्हा महालक्ष्मी येथील हाजीअली दर्गा येथे दहशतवादी हल्ला करण्याची धमकी फोनवरून देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने हाजीअली येथे १७ अतिरेकी येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांना दिली. ज्या क्रमांकावरून फोन आला, तो क्रमांक नंतर बंद असल्याचे आढळून आले. तसेच, हा फोन उल्हासनगरहून आल्याचे तपासात उघड झाले.धमकीचा फोन आल्यानंतर तत्काळ ताडदेव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, श्वान पथक, बॉम्ब शोधक पथक आणि बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला पाचारण करण्यात आले. त्यानुसार पोलिस जागोजागी तपासणी करत आहेत. मात्र, तपासात अद्याप काही हाती लागलेले नाही. हाजीअली येथील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान, धमकीचा फोन करणारी व्यक्ती मानसिक रूग्ण असून तिच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती मिळत आहे.
मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला ऐन दिवाळीत अंधेरीतील इन्फिनिटी मॉल, जुहूतील पीव्हीआर आणि सहारा हॉटेल या तीन ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. या तीनही ठिकाणी पोलिसांनी कसून चौकशी केली होती. मात्र, हाती काही लागले नव्हते. २० ऑगस्ट २०२२ ला देखील मुंबई पोलिसांना धमकीचा संदेश प्राप्त झाला होता. त्यानुसार २६/११ सारखा हल्ला करणार असल्याची धमकी अज्ञातांनी दिली होती. त्यावेळीही पोलिसांनी प्रत्येक ठिकाणी बंदोबस्त वाढवला. परंतु हे फोन आणि संदेश बनावट असल्याचे तपासात उघड झाले होते.