मुंबई : सांताक्रुझ येथील एमआयएम पदाधिकाऱ्याला एका व्यक्तीने व्हिडिओ कॉल करून भारतात बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी दिली. याप्रकरणी पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून सांताक्रुझ पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.रफत फजाहत हुसेन यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी भादंवि कलम ५०५ (१) अ, ५०६ (२) अंतर्गत धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार हुसेन हे व्यावसायीक असून ते एमआयएम पक्षाचे मध्य मुंबईतील निरीक्षक आहेत. त्यांच्याकडील दोन मोबइल क्रमांकावर अनोळखी आरोपीने बुधवारी व्हिडिओ कॉल केला होता.

त्यात त्या व्यक्तीने ‘बॉम्ब ब्लास्ट करना है, इंडिया मे तबाही करना है’, अशी धमकी दिली. या प्रकरणानंतर हुसेन यांनी सांताक्रुझ पोलिसांना याबाबतची माहिती दिली. सांताक्रुझ पोलिसांनी गुरूवारी गुन्हा दाखल केला. आरोपीने व्हिडिओ कॉल केला होता. त्याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.यापूर्वी मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पाकिस्तानातील एका क्रमांकावरून २६/११ सारखा भीषण दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणारे संदेश आले आहेत. त्याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एका अनोळखी क्रमांकावरून संदेश प्राप्त झाला आहे. सोमालिया देशातील मोबाइल क्रमांकावरून हा संदेश पाठवण्यात आला होता. त्यात त्यांच्या देशात घडलेल्या दहशतवादी घटनांच्या अनुषंगाने खबरदारी बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.

Story img Loader