मुंबईः मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी क्रमांकावर धमकीचा संदेश आल्यामुळे सर्वच यंत्रण सतर्क झाल्या आहेत. संदेशात २६/११ हल्ल्याचा उल्लेख करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बुधवारी धमकीचा संदेश प्राप्त झाला आहे. परदेशातील क्रमांकावरून हा संदेश पाठविण्यात आल्याचे समजते. याबाबत गुन्हे शाखेला कळवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘सीमा हैदर परत आली नाही, तर भारताचा नाश’, असा धमकीचा संदेश आला असून या संपूर्ण कृत्याला उत्तर प्रदेश सरकार जबाबदार असल्याचे संदेशात म्हटले आहे. प्राथमिक पाहणीत संदेश पाठवणाऱ्याने खोडसाळपणा केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा >>>सेंट जॉर्जेस रुग्णालयात लवकरच तीन नवे विभाग सुरू करणार
नोव्हेंबर, २०२२ मध्ये मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पाकिस्तानातील एका क्रमांकावरून धमकीचा संदेश आला होता. त्याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एका अनोळखी क्रमांकावरून संदेश प्राप्त झाला आहे. सोमालिया देशातील मोबाइल क्रमांकावरून हा संदेश पाठवण्यात आला होता. त्यात त्यांच्या देशात घडलेल्या दहशतवादी घटनांच्या अनुषंगाने खबरदारी बाळगण्याची सूचना करण्यात आली होती.