मुंबई: मुंबईसह देशातील प्रमुख संग्रहालये बॉम्बने उडवण्याची धमकी देणारे आठ ई-मेल आसाममधील १२ वर्षांच्या मुलाच्या ई-मेल आयडीवरून पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. व्हिडीओ गेम खेळताना अनोळखी व्यक्तीने या मुलाला फसवून त्याच्याकडून हा ई-मेल तयार करून घेतल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. कुलाब्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आणि वरळीतील नेहरू विज्ञान केंद्रासह देशातील प्रमुख संग्रहालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारे आठ ई-मेल पाठवण्यात आले होते. याप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल झाला आहे.
कुलाब्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आणि वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्रासह देशातील प्रमुख संग्रहालयांना बॉम्बने उडवण्याचे आठ ई-मेल ५ जानेवारीला मिळाले होते. पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाने तपास केल्यानंतर संशयास्पद काही आढळून आले नाही. संग्रहालयात अनेक बॉम्ब ठेवले जातील आणि त्याचे कधीही स्फोट होतील, असे ई-मेलमध्ये म्हटले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी संग्रहालय परिसरात बंदोबस्त तैनात केला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मुंबई पोलीस सायबर विभागाकडून ई-मेल पाठवणाऱ्याचे शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला.
हेही वाचा… परळ पुलावर दुचाकी-डम्परमध्ये भीषण अपघात; दोन तरुणी, एका तरुणाचा जागीच मृत्यू
त्यावेळी आसाममधील एका १२ वर्षांच्या मुलाच्या ई-मेल आयडीवर धमकीचे ई-मेल पाठवल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने आसामामध्ये जाऊन त्या मुलाकडून याबाबतची महिती घेतली असता व्हिडीओ गेम खेळताना आरोपी या मुलाच्या संपर्कात होता. ‘डिस्कॉर्ट’ या व्हिडिओ गेम खेळणाऱ्यांमध्ये प्रचलीत असलेल्या प्लॅटफॉर्मवरून दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. त्या व्यक्तीने १२ वर्षांच्या मुलाकडून हा ई-मेल आयडी तयार करून घेतल्याचे सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर घातपाताचा दूरध्वनी
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर कोणती मोठी घटना घडण्याची शक्यता असल्याचा दूरध्वनी महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला. त्या बाबतची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली असून सतर्कतेचे आदेश दिले आहेत, याबाबत मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.