मुंबईतील कुर्ला, सीएसएमटी, दादर रेल्वे स्थानकांवर एक व्यक्ती हल्ला करणार असल्याबाबत माहिती देणारा संदेश नवी मुंबईतील ११२ क्रमांकाच्या हेल्पलाईनला प्राप्त झाला होता. महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. पण सुदैवात त्यात तथ्य आढळले नाही.नवी मुंबईतील ११२ क्रमांकाच्या हेल्पलाईनवरून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनी आला होता. औरंगाबाद गंगाखेड येथून दूरध्वनी करणाऱ्या या व्यक्तीने गुजरात पोरबंदरर येथून येणारी व्यक्ती मुंबईतील कुर्ला, सीएसएमटी, दादर रेल्वे स्थानकांवर हल्ला करणार असल्याचे सांगितले. नवी मुंबई हेल्पलाईनकडून याबाबतची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर रेल्वे पोलीस व संबंधित यंत्रणांना याबाबतची माहिती देण्यात आली. या संदर्भात करण्यात आलेल्या तपासणीत त्यात कोणतेही तथ्य आढळले नाही.
हेही वाचा >>>मुंबई: अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा
यापूर्वी मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पाकिस्तानातील एका क्रमांकावरुन २६/११ सारखा भीषण दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणारे संदेश आले होते. त्याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई वाहतुक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एका अनोळखी क्रमांकावरून संदेश प्राप्त झाला आहे. सोमालियातील मोबाइल क्रमांकावरून हा संदेश पाठविण्यात आला होता. त्यात त्यांच्या देशात घडलेल्या दहशतवादी घटनांच्या अनुषंगाने खबरदारी बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. सांताक्रुझ येथेही एका व्यक्तीला घातपाताच्या धमकीचा व्हिडिओ कॉल आला होता. अशा घटनांमुळे सुरक्षा यंत्रणांवर ताण येत आहे.