लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : एका तरुणीने दोन लाख रुपयांसाठी तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याची घटना सोमवारी वडाळा परिसरात घडली. याप्रकरणी वडाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी तरुणी आणि तिच्या दोन साथीदारांना अटक केली.
वडाळा परिसरात वास्तव्यास असलेले सुमन चौरसिया यांचा तीन वर्षांचा मुलगा सोमवारी दुपारी घराबाहेर खेळत होता. तो अचानक गायब झाला. याबाबत चौरसिया यांनी वडाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. यावेळी पोलिसांनी परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची तपासणी केली. याच परिसरात वास्तव्यास असलेली सानिका वाघमारे (१८) या मुलाला घेऊन जात असल्याचे सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणात दिसले. त्यानुसार पोलिसांनी सिनिकाचा शोध सुरू केला.
आणखी वाचा-मुंबई : जुन्या इमारतीतील रहिवाशांची ‘मास्टर लिस्ट’ पुन्हा अद्ययावत होणार!
काही वेळातच दोन इसम अपहरण झालेल्या मुलाला घेऊन वडाळा पोलीस ठाण्यात आले. आरोपी तरुणीनेच या मुलाला पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यास त्यांना सांगितले होते. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले आणि त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन केले. त्यानंतर आरोपी तरुणीला अटक करून तिची चौकशी करण्यात आली. पवन पोखरकर (२०) याने या मुलाचे अपहरण करण्यास सांगितल्याचे सानिकाने कबुल केले. यासाठी पवन तिला दोन लाख रुपये देणार होता. सानिकाच्या कबुलीजबाबानंतर पोलिसांनी पवन आणि त्याचा साथिदार सार्थक बोंबले या दोघांना अटक केली.