मुंबई : नाकाबंदीत पोलिसांच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार पायधुनी परिसरात घडला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यातील एक आरोपी सराईत असून त्याच्याविरोधात यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पायधुनी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुस्तफा शेबाज पाटका (२४), माविया मुस्तफा शेख(२४) व अब्दुल रहमान गफार शेख(२३) अशी अटक आरोपींची नावे असून त्यातील पाटका हा मुंबई सेंट्रल, माविया हा पायधुनी व अब्दुल हा डोंगरी परिसरातील रहिवासी आहे. पाटका हा दुचाकी चालवत होता. एका दुचाकीवर तिघेजण प्रवास करत होते. चिमणी परिसरात आरोपींची दुचाकी नाकाबंदीजवळ आली असताना त्यांना थांबण्याचा इशारा देण्यात आला होता. पण आरोपींनी दुचाकी थांबवण्याऐवजी तिचा वेग वाढवला. यावेळी त्यांनी हेल्मेटही घातले नव्हते. त्यांना थांबवले असता त्यातील दोघे खाली उतरले. ते तैनात पोलीस शिपाई कुलाल यांच्या अंगावर धावून गेले व त्यांना मारहाण करू लागले. त्यावेळी इतर पोलीस त्यांचे मदतीकरता आले असता पाठीमागून आलेल्या मोटर सायकल स्वाराने त्या प्रसंगाचे चित्रिकरण सुरु केले. यावळी आरोपींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी पोलिसांशी झटापट केली व पोलीस शिपाई कुलाल यांना दुखापत झाली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मारुती तेलंगे यांच्या तक्रारीवरून तिघांविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, पोलिसांना मारहाण करणे, शिवीगाळ केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्या तिघांना याप्रकरणी अटक करण्यात आली.

तिन्ही आरोपींना रविवारी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.आरोपींपैकी अब्दुल रहमान अब्दुल गफार शेख हा सराईत आरोपी आहे. त्याच्याविरोधात यापूर्वी डोंगरी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. मारहाण करणे, धमकावल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. शनिवारी रात्री हा प्रकार घडला होता. याप्रकरणी रविवारी तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पायधुनी पोलीस अधिक तपास करत आहेत.