मुबई : धार्मिक स्थळाच्या मालकी हक्कावरून झालेल्या वादातून शाकीर शेख (४६) यांच्यावर चॉपरने वार करून हत्या केल्याची घटना वांद्रे येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यात एका महिलेचाही समावेश आहे. आरोपी आणि मृत व्यक्ती नातेवाईक असल्याचे पोलिसांनी सांगितले. वांद्रे पश्चिम येथील एका धार्मिक स्थळावरून शाकीर शेख आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये अनेक महिन्यांपासून वाद सुरू होता.

उभयतांमधील वाद शुक्रवारी विकोपाला गेला. वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. शाकीर यांच्यावर त्यांच्या नातेवाईकांनी चॉपरने वार केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या शाकीर यांना नजीकच्या भाभा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी इरफान खान (३५), उस्मान अली शेख (३१), जाकीर शेख (६२), फातिमा खान (३७) या चौघांना अटक करण्यात आली. शाकीर शेख यांच्या पुतण्याच्या तक्रारीवरून या चौघांविरोधात शुक्रवारी पहाटे वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.