मुंबई : एटीएम केंद्रात विसरलेले कार्ड चोरून त्याद्वारे खरेदी करणाऱ्या तीन सराईत आरोपीना चुनाभट्टी पोलिसांनी अटक केली. या आरोपींनी चोरलेली सात एटीएम कार्ड आणि दोन दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या.
चुनाभट्टी परिसरात वास्तव्यास असलेले अविनाश चव्हाण ६ ऑगस्ट रोजी येथील एका बँकेच्या एटीएम केंद्रांत पैसे काढण्यासाठी गेले होते. पैसे काढल्यानंतर चव्हाण तेथेच एटीएम कार्ड विसरून निघून गेले. हे एटीएम कार्ड आरोपी रुपेश पोखरकर (३२), प्रणय पाशीलकर (२३) आणि राजेश पवार (३२) यांना मिळाले. या तिघांनी या कार्डच्या माध्यमातून काही दुकानांमध्ये वस्तूंची खरेदी केली. ही बाब तक्रारदाराच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत चुनाभट्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सीसी टीव्ही कॅमेरातील चित्रण तपासून पोलिसांना आरोपींचा शोध घेतला. पोलिसांनी मंगळवारी याप्रकरणी रुपेश, प्रणय आणि राजेशला केली आहे. रुपेश आणि प्रणय हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी एकूण सात एटीएम कार्ड आणि दोन दुचाकी हस्तगत केल्या असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.