सराफाच्या दुकानावर दरोडा घालण्यास आलेल्या तीन गुंडांना दरोडाविरोधी पथकाने घाटकोपर येथून अटक केली. सोन्याचे दागिने घेऊन जाणाऱ्या सराफी दुकानातील कर्मचाऱ्याला लुटण्यासाठी टोळी आल्याची माहिती कुल्र्याच्या दरोडाविरोधी पथकाला मिळाही होती. त्यांनी घाटकोपरच्या हिंगवाला लेन मार्केटमधील जैन मंदिरासमोरून या तिघांना अटक केली. त्यांचे दोन साथीदार मात्र पळून गेले. अटक केलेल्या आरोपींमध्ये दुर्गेश पांडे (३०), तापुस ओराव (३०) आणि अली हुसेन इब्राहिम खान (२५) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन रिव्हॉल्वर, चॉपर आणि जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. पांडे याच्यावर खून, दरोडे, घरफोडी आदी १० गुन्हे दाखल आहेत, तर ओराव याच्यावरही दरोडय़ाचे ६ गुन्हे दाखल आहेत.