मुंबई: गांजाचा साठा असलेल्या तीन ठिकाणी मानखुर्द आणि देवनार पोलिसांनी छापा टाकून एकूण तीन आरोपींना अटक केली आहे. त्या आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी सात किलो गांजा जप्त केला असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

गोवंडी-शिवाजीनगर आणि मानखुर्द परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी वाढली असून तरुण पिढी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांच्या आहारी जात आहेत. परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी या अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी एक मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी पोलिसांनी मानखुर्द आणि देवनार पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापे घालून गांजाची तस्करी करणाऱ्या तीन आरोपीना अटक केली आहे.

हेही वाचा – धारावीत बॉम्ब असल्याचा निनावी दूरध्वनी

हेही वाचा – “हो, मीच केलं…”, आरोपीची कबुली, सैफवरील हल्ल्याचे प्रकरण

राजू चौधरी (२५), इसाक शेख (४८) आणि अब्दुल शेख (३४) अशी या अटक केलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. त्यातील राजू याच्याकडून पोलिसांनी चार किलो गांजा, तर इसाक याच्याकडून दोन किलो आणि अब्दुल याच्याकडून एक किलो असा एकूण सात किलो गांजा पोलिसांनी हस्तगत केला आहे. येणाऱ्या काही दिवसांत ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे.

Story img Loader