मुंबई : बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कोल्हापूर येथून वाघाटीची तीन पिल्ले आणण्यात आली आहेत. त्यामुळे उद्यानातील वाघाटींची एकूण संख्या आता ११ झाली आहे.काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमधील एका गावात ऊसतोडणी करणाऱ्या कामगारांना शेतात वाघाटीची तीन पिल्ले आढळली होती. प्रथमदर्शनी ती मांजरीची पिल्ले असल्याचे समजून ऊसतोड कामगारांनी त्या पिल्लांना घरी नेले. ही बाब वनविभागाच्या लक्षात येताच वनविभागाने वाघाटीची पिल्ले ताब्यात घेऊन ती जेथे सापडली होती तेथे ठेवली. पिल्लांची व आईची भेट होण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांची आई तेथे न आल्याने अखेरीस ती पिल्ले संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडे सुपूर्द करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाघाटी हा मांजर कुळातील प्राणी आहे. बिबटय़ाच्या हुबेहूब लहान प्रतिकृतीसारखी वाघाटी दिसते. त्यांचा रंग व अंगावरील ठिपके हे बिबटय़ाप्रमाणेच असतात. दरम्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘वाघाटी प्रजनन प्रकल्प’ राबविला जात आहे. राष्ट्रीय उद्यानात दुर्मीळ होत चाललेल्या वाघाटीच्या वाढीसाठी २०१३ पासून हा प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पात वाघाटीच्या पिंजराबंद प्रजननाचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यांच्यासाठी विशिष्ट प्रकारचे पिंजरे तयार करण्यात आले आहेत. सध्या उद्यानात आणण्यात आलेल्या वाघाटीच्या पिल्लांसह पूर्वीची वाघाटीची १ जोडी तसेच पुणे येथून काही वर्षांपूर्वी आणण्यात आलेली अशी उद्यानातील वाघाटींची संख्या एकूण ११ झाली आहे. सध्या प्रजनन केंद्रात असलेल्या वाघाटीची एक जोडी वगळता इतर निमवयस्क आहेत.

मांजर कुळातील प्राण्यांच्या एकूण १५ प्रजाती भारतात आढळतात. भारतात असलेल्या एकूण मांजर कुळातील प्रजातींपैकी दहा लहान प्रजाती आहेत. वाघाटी मुख्यत: उंदीर, घुशी अशा कृंतक वंशीय प्राण्यांची शिकार करतात. त्यामुळे त्यांची पर्यावरण आणि अन्नसाखळीत महत्वाची भूमिका आहे. वाघाटी ही भारतातील रान मांजरीनंतर सर्वात सामान्य आणि व्यापक प्रजाती आहे. पश्चिम घाटाच्या काही भागात मर्यादित प्रमाणात हा प्राणी सापडतो. वाघाटीचा मानवी वस्तीजवळील जंगलात वावर असतो. आकार लहान असला तरी अत्यंत चपळ आणि अंधारात शिकार करण्यात तरबेज असलेला हा प्राणी आहे. वाघाटीच्या कपाळावर चार उभ्या रेषा असतात. मानेखालची बाजू पांढरी असते. तसेच डोळ्याभोवती पांढरी वर्तुळे असतात. पाठीवर करड्या रंगाचे ठिपके असतात. वाघाटीचे वजन सुमारे एक ते दीड किलो असते. निशाचर आणि लाजाळू असल्याने वाघाटी सहजी दृष्टीस पडत नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three baby vagathias brought from kolhapur to sanjay gandhi national park in borivali mumbai print news sud 02