मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे सादर करणाऱ्या हास्य कलाकार कुणाल कामराविरोधातील तीन गुन्हे खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यात नाशिक ग्रामीण, जळगाव व नाशिक (नांदगाव) येथील प्रकरणांचा समावेश आहे. याप्रकरणी कामराविरोधात खार पोलीस ठाण्यात यापूर्वीच एक गुन्हा दाखल केला आहे. त्यात शिवसेनेकडून (शिंदे) मुरजी पटेल तक्रारदार आहेत.
तीन गुन्हे वर्ग
मनमाड येथील शिवसेना (शिंदे) शहर प्रमुख मयुर बोरसे यांच्या तक्रारीवरून मनमाड पोलिसांनीही कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल केला होता. तो गुन्हा खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यात कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांची बदनामी केल्याचा तसेच दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेष निर्माण केल्याचा आरोप आहे. याशिवाय जळगावचे शिवसेना (शिंदे) शहर प्रमुख संजय दिगंबर भुजबळ यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. ते प्रकरणही मुंबई पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. नाशिक नांदगाव येथील हॉटेल व्यावसायिक सुनील शंकर जाधव यांच्या तक्रारीप्रकरणी दाखल गुन्हाही खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या तीन प्रकरणांसह शिवसेना नेते मुरजी पटेल यांच्या तक्रारीवरून खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या सर्व गुन्ह्यांचा तपास आता एकत्रित करण्यात येणार आहे. सर्व गुन्हे खार येथील कार्यक्रमातील कामराच्या विडंबनात्मक गाण्याबद्दल आहेत. ही घटना खार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे ते सर्व गुन्हे खार पोलिसांना वर्ग करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबईतील गुन्ह्याची माहिती
शिवसेना नेते मुरजी पटेल यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे. तक्रारीनुसार, २३ मार्च रोजी एका कार्यक्रमात असताना माझ्या मोबाइलवर आमच्या पक्षाच्या एका कार्यकर्त्याने पाठवलेली लिंक प्राप्त झाली. त्यात कुणाल कामराने कॉन्टीनेन्टल हाँटेल, रोड नं ०३, खार पश्चिम, मुंबई या ठिकाणी केलेल्या एका स्टॅण्डअप कॉमेडी शोच्या कार्यक्रमाची व्हिडीओ क्लिप प्रसारित केली होती. ती पाहिली असता त्यामध्ये कामरा स्टॅण्डअप कॉमेडी शोमध्ये शिवसेना व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची बदनामी करीत होता. ठाणे जिल्ह्यातील एक नेते असा उल्लेख करून त्यांनी विडंबनात्मक गाणे गायले. त्यामुळे एकमेकांप्रतीच्या भावना कलुशित होऊन दोन राजकीय पक्षांमध्ये व्देष भावना उत्पन्न होत आहे, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असल्याचे माहिती असून त्यांच्या नैतिक आचरणावर निंदाजनक वक्तव्य करून त्यांची बदनामी केली. तसेच आमच्या पक्षाच्या व आमच्या प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाच्या एकमेकांप्रतीच्या भावना कलुषित करून दोन राजकीय पक्षांमध्ये व्देष भावना उत्पन्न केल्या म्हणून माझी त्याच्या विरोधात कायदेशीर तक्रार आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.