मुंबई : सोमय्या विद्याविहार विद्यापीठाच्या तीन महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी बनावट गुणपत्रिका बनवल्याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांसह तिघांना टिळक नगर पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.
आरोपींनी पालकांकडून पैसे घेऊन सुमारे ५० विद्यार्थ्यांच्या नावाने बनावट गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला व ई-मेल आयडी बनवून त्यांना ११ वीसाठी प्रवेश मिळवून दिला, असा आरोप आहे. दरम्यान, अशा प्रकारे बेकायदा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
के. जे. सोमय्या कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशन पवार यांनी स्वत: गैरप्रकार उघड करून या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती. के.जे. सोमय्या विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, एस. के सोमय्या विनय मंदिर सेकंडरी स्कूल व ज्युनियर कॉलेज व के.जे. सोमय्या कला आणि वाणिज्य या तीन महाविद्यालयांमध्ये आरोपींनी गैरप्रकार केल्याचे निष्पन्न झाले.
हेही वाचा – Nilkmal Passenger Boat Case: नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा
याप्रकरणी महेश विष्णु पाटील (४९), अर्जुन वसाराम राठोड (४३) व देवेंद्र सूर्यकांत सायदे (५५) यांना टिळक नगर पोलिसांनी अटक केली. यापैकी पाटील एस. के सोमय्या विनय मंदिर सेकंडरी स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे लिपिक पदावर कामाला होता, तर राठोड के.जे. सोमय्या कला आणि वाणिज्य महाविद्यालात लिपिक होता. तिसरा आरोपी सायदे दलाल म्हणून काम करीत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. चौकशीत आणखी तीन संशयित कमलेशभाई, जितूभाई आणि बाबूभाई यांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांनाही या प्रकरणी आरोपी करण्यात आले आहे. आरोपींनी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पात्र बनवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचा संशय आहे.
प्रत्येक पालकाकडून दीड ते दोन लाख उकळले
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष तपास पथकामार्फत या प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे. पाच सदस्य असलेल्या या पथकाचा प्रमुख साहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाचा अधिकारी आहे, असे सूत्रांनी सांगितले. या टोळीने सुमारे ५० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिल्याचा आरोप आहे. त्यात मुख्यत: सीबीएससी, आयबी, आयसीएसई व आयजीसीएसईसारख्या मंडळातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडली. त्यात एसएससी मंडळातील विद्यार्थ्यांची माहिती यंत्रणेत उपलब्ध होती. त्यात विद्यार्थ्याचे नाव व क्रमांक भरला की उर्वरित माहिती थेट भरली जायची. पण इतर मंडळातील विद्यार्थ्यांचे गुण, शाळा अशी माहिती स्वत: भरावी लागत होती. आरोपीने याच गोष्टीचा फायदा घेऊन या ५० विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी बनावट गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला व ई-मेल आयडी तयार करून यंत्रणेत खोटी माहिती भरली. त्याआधारे पालकांकडून पैसे घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला होता. यापूर्वीही आरोपींनी अशा प्रकारे प्रवेश दिल्याचा संशय असून त्याबाबतही तपास पथकाद्वारे तपास करण्यात येणार आहे. आरोपींनी प्रत्येक पालकांकडे ११ वीच्या प्रवेशासाठी दीड ते दोन लाख रुपयांची मागणी केली होती.
अकरावीतील ४७ विद्यार्थ्यांचे नियमबाह्य प्रवेश रद्द, मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांचे स्पष्टीकरण
२०२४ – २५ या शैक्षणिक वर्षात बनावट गुणपत्रिका व कागदपत्रांच्या आधारे या तीन महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीसाठी नियमबाह्य प्रवेश मिळवलेल्या ४७ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले आहेत. तसेच व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देतो, अशी बतावणी करीत पालकांची आर्थिक फसवणूक केलेल्या दोशी कर्मचाऱ्यांना संबंधित तिन्ही कनिष्ठ महाविद्यालयांनी निलंबित केल्याचे मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी स्पष्ट केले. तसेच या आदेशानुसार कनिष्ठ महाविद्यालयांनी दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांच्याविरुद्ध टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीनुसार गैरप्रकारात सामील असलेल्या लिपिकांना टिळक नगर पोलिसांनी सोमवारी अटक केली.
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत एकूण ४७ विद्यार्थ्यांचे प्रवेश नियमबाह्य पद्धतीने झाल्याचे के. जे. सोमय्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी २४ ऑक्टोबर २०२४ रोजी पत्राद्वारे मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास कळविले होते. त्याअनुषंगाने विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सदर कनिष्ठ महाविद्यालयास तात्काळ भेट देऊन प्राथमिक चौकशी केली. तसेच सोमैया ट्रस्ट संस्थेच्या उपरोक्त तिन्ही कनिष्ठ महाविद्यालयांत संस्थेच्या लिपिकांनी बनावट गुणपत्रिका व शाळा सोडल्याच्या दाखल्याच्या आधारे ४७ विद्यार्थ्यांना नियमबाहय प्रवेश मिळवून दिल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर नियमबाह्य पद्धतीने मिळवलेले प्रवेश रद्द करण्याचे आणि संस्थेच्या दोषी कर्मचाऱ्यांविरुद्ध प्रशासकीय व फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.
दरम्यान, मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या आदेशानुसार सोमैया विद्याविहार विद्यापीठातील तिन्ही कनिष्ठ महाविद्यालयांनी अकरावीतील ४७ विद्यार्थ्यांचे नियमबाह्य प्रवेश रद्द केले आहेत, अशी माहिती मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांनी दिली.