ठाणे महापालिकेतील स्थायी समिती सदस्यपदाच्या निवडणुकीत शिस्तभंग आणि पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिकेतील पक्षाचे गटनेते सुधाकर चव्हाण, नगरसेविका तेजस्विनी चव्हाण आणि राजश्री नाईक या तिघांवर बडतर्फीची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीमधून आठ सदस्य निवृत्त झाले असून, त्यामध्ये मनसेचे गटनेते आणि स्थायी समिती सभापती सुधाकर चव्हाण यांचा समावेश होता. सुधाकर चव्हाण यांच्या निवृत्तीमुळे रिक्त झालेली जागा मिळविण्यासाठी मनसेच्या सर्वच नगरसेवकांनी प्रयत्न सुरू केले होते. सुरुवातीला दिव्यातील मनसेचे नगरसेवक शैलेश पाटील यांचे नाव चर्चेत होते. मात्र दिव्यात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी पाटील अडचणीत सापडले आहेत. यामुळे काही दिवसात त्यांचे नाव मागे पडले. दरम्यान ठाणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा मंगळवारी पार पडली. यामध्ये मनसेच्या कोटय़ातून स्थायी समिती सदस्यपदावर राजश्री नाईक यांची निवड करण्यात आली. मात्र, या पदासाठी राज ठाकरे यांनी नगरसेविका रुचिता मोरे यांच्या नावाची शिफारस केली होती. असे असतानाही पक्षाचे गटनेते सुधाकर चव्हाण यांनी पक्षादेश धुडकावून लावत नगरसेविका राजश्री नाईक यांच्या नावाची सभेमध्ये शिफारस केली. त्यानुसार सभेमध्ये त्यांच्या नावाची सदस्यपदावर घोषणा करण्यात आली. यामुळे पक्ष शिस्तभंग आणि पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी राज ठाकरे यांनी सुधाकर चव्हाण, नगरसेविका तेजस्विनी चव्हाण आणि राजश्री नाईक या तिघांवर बडतर्फीची कारवाई केली आहे, अशी माहिती ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.

Story img Loader