लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी तीन वेगवेगळ्या कारवायांत  नगरविकास खात्यातील उपसचिव, गोवंडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक तसेच कुलाबा अग्निशमन दलातील अधिकारी यांच्यासह एकूण पाचजणांना लाचखोरी प्रकरणी अटक केली.
शासकीय सेवेत पुन्हा सामावून घेणारे मान्यतापत्र देण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करून त्यातील निम्मे पैसे घेताना नगरविकास खात्याचे उपसचिव आनंदराव जिवणे यांच्यासह कक्ष अधिकारी उदयसिंग चौहान आणि लिपिक सुभाष मोरे या तिघांना अटक करण्यात आली. पुणे पालिकेतील उपायुक्तांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
पुणे महापालिकेअंतर्गत मंडया बीओटी तत्त्वावर विकसित करण्याबाबत झालेल्या अनियमिततेसंदर्भात संबंधित उपायुक्त आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली. परंतु ते सर्व निर्दोष ठरले. पुन्हा सेवेत सामावून घेण्याबाबत जिवणे आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी एक लाख रुपयांची मागणी केली होती. अखेरीस ५० हजार रुपयांवर तडजोड झाली. ही रक्कम कार्यालयातच स्वीकारताना जिवणे यांना अटक करण्यात आली.
नोकरीसाठी परदेशी पाठविण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या आरोपीकडून ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना गोवंडी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांना पकडण्यात आले. वाशी येथील एका हॉटेलमध्ये  ही कारवाई करण्यात आली. पाटील यांच्या घराची झडती घेतली असता ३० लाख ७१ हजार २०० हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा  ३९ लाख ५३ हजार ३९० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. संबंधित आरोपीला १५ जणांचे पैसे परत करण्यास सांगितले होते. तसेच आपल्यालाही काही रक्कम हवी, अशी पाटील यांनी मागणी केली होती. पाच लाखांच्या लाचेची मागणी करण्यात आली. अखेरीस तीन लाख रुपयांवर तडजोड झाली आणि त्यापैकी पहिला हप्ता स्वीकारताना पाटील यांना अटक करण्यात आली.
कुलाबा अग्निशमन केंद्रातील अधिकारी प्रकाश प्रभू यांना २० हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. फिर्यादीचा हॉटेल व्यवसाय असून प्रभू हे फिर्यादीच्या हॉटेलमध्ये पाहणी करण्यासाठी गेले होते. वापरात असलेले सिलिंडर बेकायदेशीर असल्याचे सांगून त्यांना कुलाबा येथील कार्यालयात भेटण्यासाठी बोलाविले. फिर्यादी भेटण्यासाठी गेले असता आणलेली कागदपत्रे जुनी असल्याचे सांगून फिर्यादीकडे १ लाख २० हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम न दिल्यास हॉटेलचा परवाना रद्द करण्याची धमकी दिली. तडजोडीअंती ४५ हजार रुपयांची मागणी करून २० हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्यास सांगितले. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी कुलाबा कार्यालयात सापळा रचून ही रक्कम स्वीकारताना प्रभू यांना पकडले.

Story img Loader