मुंबई : यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर गर्डर अर्थात तुळई बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी २२ जानेवारी, बुधवारपासून ते २४ जानेवारीपर्यंत दुपारी १२ ते ३ या वेळेत वाहतूक ब्लाॅक घेण्यात येणार आहे. ब्लॉकच्या कालावधीत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद राहणार असून ती इतर मार्गांवर वळवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) महामार्गावरील मुंबई वाहिनीवरील किमी क्रम. ५८/५०० (डोंगरगाव/कुसगाव) येथे पूल बांधण्यात येत आहे. त्या पुलाची तुळई बसविण्यात येणार आहे. हे काम २२ ते २४ जानेवारीदरम्यान दुपारी १२ ते ३ या वेळेत केले जाणार आहे. त्यासाठी तीन तासांचा वाहतूक ब्लाॅक जाहीर करण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत सुरु राहणार आहे.
हेही वाचा – मुंबई : पत्राचाळीतील विजेत्यांना उद्यापासून देकार पत्र
हेही वाचा – अतुल भोसले यांच्या आमदारकीला पृथ्वीराज चव्हाण यांचे उच्च न्यायालयात आव्हान
तीन तासांच्या वाहतूक ब्लाॅकदरम्यान मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक महामार्गाच्या पुणे वाहिनीवरील किमी क्र. ५४/७०० वळवण ते वरसोली टोलनाका येथून देहूरोडमार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. दुपारी ३ नंतर मुंबई वाहिनीवरील मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत राहील. त्यामुळे या तीन दिवसांच्या काळात मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांना दुपारी काही प्रमाणात वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागणार आहे. ब्लॉक असल्याचे लक्षात घेऊन योग्य ते नियोजन करावे असे आवाहन एमएसआरडीसीकडून करण्यात आले आहे.