बेलापूरमध्ये अपघात; मृत पुणे जिल्ह्यातील
बेलापूर येथील किल्ले गावठाण चौकात सोमवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास कंटेनर आणि फोर्ड कार यांच्या भीषण अपघातात कारमधील तीन तरुण जागीच ठार झाले, तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. वाशीहून चाकणला जाण्यासाठी निघलेली ही कार कंटेनरच्या ट्रॉलीखाली घुसून दुसऱ्या बाजूने बाहेर पडली़ या भीषण अपघातात गाडीतील दोन तरुणांची डोकी धडावेगळी झाली.
आतिश वसंत ऊर्फ गोटय़ा जम्बुकर (वय २२, रा. राणूबाईमळा, चाकण), दिनेश तुकाराम ठोंबरे (वय २५), राहुल धर्मा ठोंबरे (वय २३, दोघे रा. ता. खेड) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत़ गणेश संपत जम्बुकर आणि राजन कुशवाह हे दोघे अपघातात जखमी झाले आहेत़ गणेशला किरकोळ दुखापत झाली आह़े मात्र राजन अद्याप शीव रुग्णालयात उपचार घेत आहे. पनवेल येथे एका गाडीचा व्यवहार करून हे तरुण वाशीत आले होते. त्यानंतर ते पहाटे गावाच्या दिशेने निघाले होते. पामबीच मार्गावरून त्यांची फोर्ड फिगो कार किल्ले गावठाण चौकात आली. त्याच वेळी नवी मुंबईतून उरणकडे जाणारा कंटनेर सिग्नलवर आडवा आला़ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला.
या भीषण अपघाताच्या वेळी स्फोट झाल्यासारखा आवाज आला. त्यामुळे पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत. कंटेनरचालक संजयकुमार फुलदेव याने अपघाताची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान, या तरुणांनी मद्यपान केल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी मुंबईत पाठविण्यात आले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा