मुंबई : गेल्या काही दिवसात पश्चिम उपनगरातील वर्सोवा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला (ठाकरे) खिंडार पडले आहे. या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे (ठाकरे) चार माजी नगरसेवक होते. चारपैकी तीन माजी नगरसेवकांनी ठाकरे यांची साथ सोडली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेला (ठाकरे) येथील प्रभागांसाठी नवीन उमेदवार शोधावे लागणार आहेत.

वर्सोवा मतदारसंघातील माजी नगरसेवक राजू पेडणेकर व राजुल पटेल यांनी शिवसेनेतून (ठाकरे) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्याआधी याच मतदारसंघातील माजी नगरसेविका प्रतिमा खोपडे यांनीही ठाकरे यांना जय महाराष्ट्र करीत शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला होता. तसेच २०१२ च्या कार्यकाळातील माजी नगरसेवक संजय पवार यांनीही शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला. राजू पेडणेकर आणि राजूल पटेल हे दोन माजी नगरसेवक म्हणजे शिवसेनेचा (ठाकरे) चेहरा होते. या दोन्ही माजी नगरसेवकांचा आपापल्या प्रभागात चांगला जनसंपर्क होता. राजुल पटेल या रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या म्हणून प्रसिद्ध होत्या. मात्र आता हे दोन्ही उमेदवार शिवसेनेत (शिंदे) गेले आहेत. तसेच पवार आणि खोपडे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्यामुळे येत्या पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेला (ठाकरे) नवीन उमेदवार द्यावे लागणार आहे.

शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पालिकेची निवडणूक जाहीर होईल तेव्हा मुंबईतील सर्व प्रभागात लढता येईल एवढ्या उमेदवारांची जमवाजमव करण्याचे शिवसेनेचे (शिंदे) प्रयत्न सुरू आहेत. ठाकरे यांचे एक एक उमेदवार गळाला लावण्यात शिंदे यशस्वी होत आहेत. त्यात वर्सोवा मतदारसंघाला अक्षरश: खिंडारच पडले आहे. या मतदारसंघातील सहापैकी दोन जागा भाजपकडे आहेत, तर चार जागा ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहेत. त्यापैकी एका जागेवर आमदार हारून खान यांच्या पत्नी जिंकून आल्या होत्या. उरलेल्या तीनही जागांवरील जिंकून आलेले माजी नगरसेवक आता शिवसेनेत (शिंदे) आहेत. त्यामुळे या उमेदवारांविरोधात तितकेच ताकदीचे उमेदवार उद्धव ठाकरे यांना शोधावे लागणार आहेत.

दरम्यान, माजी नगरसेवक गेले तरी कार्यकर्ते आणि मतदार आमच्यासोबतच असल्याचा विश्वास या मतदारसंघातील इतर पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पक्षाकडे उमेदवारांची कमतरता नाही. जो उमेदवार दिला जाईल तो आम्ही निवडून आणू आणि आमच्या मतदारांना फक्त उद्धव ठाकरे यांचा चेहरा असला तरी त्यावर मते मिळणार आहेत, असाही विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.