लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तीन माजी नगरसेवकानी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यात जोगेश्वरीमधील प्रभाग क्रमांक ७३ चे माजी नगरसेवक प्रवीण शिंदे, वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील माजी नगरसेविका प्रतिमा खोपडे आणि प्रभाग क्रमांक ८८ च्या माजी नगरसेविका स्नेहल शिंदे यांचा समावेश होता.
त्यांच्यासह जोगेश्वरी, वर्सोवा आणि विलेपार्ले विभागातील १०० हुन अधिक पदाधिकाऱ्यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुंबईत आतापर्यंत ठाकरे गटाच्या ३३ माजी नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असून आता ही संख्या ३६ झाल्याचे ते यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्तृत्वाने प्रेरित होऊन शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी या माजी नगरसेवकानी सांगितले.
आणखी वाचा-पक्ष, चिन्हांवर दावा सांगण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत रस्सीखेच
महायुती सरकार सत्तेत आल्यापासून मुंबईत अनेक विकासकामे वेगाने सुरू झाली असून त्यामुळे या आंतरराष्ट्रीय शहराला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय शहर बनवण्याचा प्रयत्न सुरू झाला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मुंबईतील रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देऊन मुंबईतून बाहेर गेलेला मराठी माणूस पुन्हा मुंबईत घेऊन येणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.
मुंबईतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करून शहर पूर्णपणे खड्डेमुक्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पाऊस थांबल्यानंतर सिमेंटचे रस्ते करण्याच्या कामाला गती येइल. त्यामुळे येत्या दोन ते अडीच वर्षात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सरकारच्या निर्णयक्षमतेकडे आकर्षित होऊन फक्त मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक जण शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत असल्याचे ते म्हणाले.
आणखी वाचा-मंत्रालयात १० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम नेण्यावर बंदी
आज ज्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्याना त्यांच्या प्रभागातील रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी नक्की विकसनिधी देण्यात येईल लोकांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी निधीची कमतरता जाणवणार नाही असेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.