लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेची दोन शकले पडल्यानंतर ठाकरे गटातून शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. मंगळवारी देखील मुंबईतील तीन माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांना ‘जय महाराष्ट्र’ करीत शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला.
ठाकरे गटातून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पालिकेची निवडणूक जेव्हा जाहीर होईल तेव्हा मुंबईतील सर्व प्रभागात लढता येतील एवढे उमेदवार जमवण्यासाठी शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत. ठाकरेंचे एक एक उमेदवार गळाला लावण्यात शिंदे यशस्वी होत आहेत. जानेवारी महिन्यात वर्सोवा मतदारसंघातील राजुल पटेल यांनी ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ केला.
पंधरा दिवसांपूर्वी वांद्रे विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे (ठाकरे) उपविभागप्रमुख जितेंद्र जनावळे यांनीही शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला. त्यानंतर रविवारी माजी नगरसेवक राजू पेडणेकर, माजी नगरसेवक आणि उपविभागप्रमुख संजय पवार यांनी ठाकरे यांची साथ सोडली. तसेच कुर्ल्यातील माजी नगरसेविका डॉ. अनुराधा पेडणेकर यांनीही शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला. त्यातच मंगळवारी आणखी तीन माजी नगरसेवकांनी शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला.
यावेळी दापोलीचे माजी आमदार संजय कदम, छत्रपती संभाजी नगरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्यासह मुंबईतील तीन माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईतील भांडुपमधील माजी नगरसेवक उमेश पाटील, चेंबूरच्या माजी नगरसेविका अंजली नाईक आणि गोरेगाव येथील माजी नगरसेविका लोचना चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख आणि शिवसैनिकांनी शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला.