मुंबई : भांडुप (प.) येथील तुळशीपाडा परिसरातील गायत्री विद्या मंदिरनजिकच्या चाळीतील एका घराची भिंत बुधवारी रात्री कोसळली. या दुर्घटनेत दोन महिलांसह तिघे जखमी झाले. उपचारासाठी जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. दोन्ही महिलांना उपचार केल्यानंतर घरी सोडण्यात आले. तर, अन्य जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> आमचे पैसे परत द्या! वातानुकूलित उपनगरी रेल्वेगाड्यांतील पासधारक प्रवाशांची मागणी
मुंबई आणि दोन्ही उपनगरात बुधवारी सायंकाळी मुसळधार पाऊस कोसळू लागला. हवामान खात्याने २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० पर्यंत मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला होता. पावसाचा जोर वाढल्याने बुधवारी सायंकाळी मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचले. दरम्यान, वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. पावसाचा जोर बुधवारी रात्री काहीसा कमी झाला. मात्र, तत्पूर्वी पावसाने मुंबईची दाणादाण उडविली. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकलचे वेळापत्रक कोलमडले. परिणामी, रेल्वे प्रवाशांचीही प्रचंड गैरसोय झाली. अखेर अनेकांनी चालत इच्छितस्थळे गाठली. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने सतर्क होऊन विविध यंत्रणांना सज्ज केले. तसेच, पर्जन्य जलवाहिन्या विभागातील कामगारही रस्त्यावर उतरून कर्तव्य बजावत होते. मुसळधारांमुळे शहरात ५, पूर्व उपनगरात २ व पश्चिम उपनगरात १४ अशा एकूण २१ ठिकाणी झाडे व फांद्या पडल्या. तसेच, शहरात ९, पूर्व व पश्चिम उपनगरात १२ अशा एकूण २१ ठिकाणी शॉर्ट सर्किट झाले. मात्र, पालिका प्रशासनाने तत्काळ विद्युत पुरवठा यंत्रणेस संबंधित घटनांची माहिती देऊन मदतकार्य रवाना केले. सुदैवाने या घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही.
हेही वाचा >>> ऑनलाईन रमी हा खेळ संधीचा की कौशल्याचा भाग ? राज्य सरकाला भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
दरम्यान, मुंबई शहरात २, पूर्व उपनगरात ७ आणि पश्चिम उपनगरात १ अशा एकूण १० ठिकाणी घराचा काही भाग कोसळल्याच्या दुर्घटना घडल्या. त्यापैकी भांडुपमधील तुळशीपाडा परिसरातील गायत्री विद्या मंदिर नजिकच्या चाळीत एका घराची भिंत कोसळली. दुर्घटनाग्रस्त घरात चार जण अडकले होते. स्थानिकांनी संबंधित घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर, अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. अग्निशामकांनी दुर्घटनाग्रस्त घरात अडकलेल्या चारही जणांना सुखरुप बाहेर काढले. या दुर्घटनेत क्रांती पाठोळे (२६), शिला पाठोळे (४५), सुरेंद्र पाठोळे (५६) जखमी झाले. जखमींना तात्काळ नजीकच्या सिद्धी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर क्रांती आणि शिला यांना घरी पाठविण्यात आले. तर, सुरेंद्र यांच्यावर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.