मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या विरार – अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेसह जालना – नांदेड समृद्धी मार्ग (विस्तारीत मार्ग) आणि पुणे वर्तुळाकार रस्ता प्रकल्प लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या तिन्ही महत्त्वाकांक्षी आणि मोठ्या प्रकल्पांच्या बांधकामासाठी मंगळवारी स्वारस्य निविदा जारी केल्या आहेत. तिन्ही प्रकल्पांची कामे टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून समृद्धी महामार्गाप्रमाणे प्रत्येक टप्प्यासाठी स्वतंत्र कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी, तसेच विरार – अलिबाग अंतर कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) विरार – अलिबागदरम्यान १२८ किमी लांबीची बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका बांधण्याचा निर्णय घेतला होता. मात्र एमएमआरडीएला हा प्रकल्प मार्गी लावता न आल्याने तो एमएसआरडीसीला हस्तांतरीत करण्यात आला. त्यानुसार आता १२८ किमीपैकी ९६.४१ किमी लांबीच्या मार्गिकेच्या बांधकामासाठी स्वारस्य निविदा जारी करण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील ९६.४१ किमी लांबीच्या मार्गिकेचे बांधकाम ११ टप्प्यात करण्यात येणार आहे. प्रत्येक टप्प्यासाठी स्वतंत्र कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.
हेही वाचा – मुंबई-जीवी : वन अधिकाऱ्याचे नाव मिळालेला आरेमधील कोळी
मुंबई – नागपूर अशा ७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाचा विस्तार जालना – नांदेडपर्यंत करण्यात येणार आहे. यासाठी एमएसआरडीसीने १९० किलोमीटर लांबीचा जालना – नांदेड महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. आता या प्रकल्पाच्या कामासाठी स्वारस्य निविदा जारी करण्यात आल्या आहेत. पाच टप्प्यात या महामार्गाचे काम करण्यासाठी स्वारस्य निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्याच वेळी पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पुणे रिंग रोड अर्थात पुणे वर्तुळाकार रस्ता बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १३६ किमी लांबीच्या रस्त्याच्या बांधकामासाठी एमएसआरडीसीने स्वारस्य निविदा जारी केल्या आहेत. एकूण नऊ टप्प्यांमध्ये हे काम करण्यात येणार आहे. नऊ टप्प्यांसाठी स्वतंत्र निविदा मागविण्यात आल्या आहेत. एमएसआरडीसीने तीन प्रकल्पांच्या कामासाठी एकूण २६ टप्प्यांमध्ये एकत्रित स्वारस्य निविदा जारी केली आहे. इच्छुकांना ३० मेपर्यंत निविदा सादर करता येणार आहेत.
हेही वाचा – गोवंडीतील अनधिकृत बांधकामाविरोधात मनसे आक्रमक
पुढील वर्षी कामास सुरुवात
पुढील तीन महिन्यांत स्वारस्य निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर अंतिम निविदा मागविण्यात येतील. ही संपूर्ण निविदा प्रक्रिया पूर्ण करून बांधकामाचे कार्यादेश जारी करण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी अपेक्षित आहे. या तिन्ही प्रकल्पांच्या प्रत्यक्ष कामाला २०२४ मध्ये सुरुवात करण्याचे नियोजन आहे. दरम्यान, या तिन्ही प्रकल्पांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. भूसंपादन पूर्ण झाल्यानंतरच कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात येणार आहेत, असे एमएसआरडीसी, सहव्यवस्थापकीय संचालक, अनिलकुमार गायकवाड म्हणाले.