मित्राने जबरदस्ती घेतलेला मोबाइल परत मागितल्याने झालेल्या वादात तिघांनी मित्राचीच हत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी गोवंडी येथे घडली आहे. याबाबत देवनार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तीन आरोपींना अटक केली आहे.
फरान चौहान (वय ३४) असे या मृत व्यक्तीचे नाव असून तो गोवंडीच्या टाटा नगर परिसरात राहात होता. दोन दिवसांपूर्वी फरानचा मित्र बिलाल सय्यद (वय २८) याने जबरदस्ती फरानकडून त्याचा मोबाइल घेतला होता. मोबाइल घेण्यासाठी फरान रविवारी गोवंडीच्या बैंगणवाडी परिसरात गेला होता. मात्र आरोपीने मोबाइल परत करण्यास विरोध केल्याने दोघांमध्ये मोठा वाद झाला होता. याच वेळी आरोपी आणि त्याचे दोन साथीदार रहमतल्ला शेख (वय १९) आणि अस्लम शेख (वय २३) यांनी त्याला जबर मारहाण केली. त्यानंतर बिलालने टोकदार सळईने फरानवर वार केले.